आरोग्यदूत झाले संवाददूत’ मंगेश चिवटेंनी सार्थ ठरवला मुख्यमंत्र्यांचा विश्वास !
मराठा आरक्षण आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली

‘आरोग्यदूत झाले संवाददूत’ मंगेश चिवटेंनी सार्थ ठरवला मुख्यमंत्र्यांचा विश्वास !

डॉ.शार्दुल संतोषराव भणगे-धामणगांवकर

जिगरबाज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश मिळाले. कोट्यावधी मराठा बांधवांच्या एकजूटीचा हा विजय आहे. कृतज्ञतेच्या भावनेतून स्व.आण्णासाहेब पाटील, स्व.विनायक मेटे यांचे आज स्मरण होणे अगत्याचे आहे. महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, कार्यक्षम उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सरकारने समाजाच्या सर्वांगीण विकासाप्रती आपली असलेली सकारात्मकता कालच्या निर्णयाच्या माध्यमातून सिद्ध केली आहे. आजच्या लढ्याचे यश हे मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या बांधवांचे आहे. याबरोबरच हे सर्व आंदोलन होत असताना एक नाव समाजाने कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते म्हणजे ‘मंगेश नरसिंह चिवटे’ ! लाठीचार्जनंतर जखमींच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून देण्याचे तसेच आंदोलनात बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे आदेश मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचे विश्वासू शिलेदार मंगेश चिवटे यांना दिले. यानंतर सातत्याने मनोज जरांगे पाटलांच्या संपर्कात राहून या व्यक्तीने वैद्यकीय मदत तर पोहचवलीचं शिवाय या आंदोलनात आंदोलकांमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय साधण्याची महत्वपूर्ण भूमिका देखील मंगेश चिवटे यांनी निभावली. ज्यावेळी आंदोलन उग्र स्वरुप धारण करत होते अर्थात् कोणत्याही राजकीय नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती, त्यावेळी मंगेश चिवटेंच्या रुपात मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून हा अराजकीय चेहरा मोठ्या धाडसाने त्याठिकाणी पोहचत होता. एवढेच नव्हे तर मनोज जरांगे पाटलांनी पहिल्यांदा केलेल्या आमरण उपोषणावेळी मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. तेंव्हापासून ते कालपर्यंत मंगेश चिवटे हे सातत्याने संवाददूत म्हणून काम करत होते. एकदा तर नागपूरहून जालन्याला मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी रात्रीतून येत असताना समृद्धी महामार्गावर सुमारे रात्रौ १.३० वा. चालकाला झोप लागली होती. सुदैवाने शेजारच्या सीटवर झोपलेल्या चिवटेंना अचानक जाग आली आणि चालकाकडे लक्ष गेले. गाडी बाजूला घ्यायला लावत चिवटेंनी आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याला गाडी चालवण्यास सांगितले. अन्यथा जो प्रकार होत होता त्याची कल्पना देखील न केलेली बरी ! कोणत्याही रात्री मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की पहाटे ४.०० वा. त्यांचा संदेश घेवून मंगेश चिवटे हे विमानाने सकाळी छ.संभाजीनगरमध्ये दाखल व्हायचे. बऱ्याचदा कामाच्या व्यापामुळे अंगात त्राण शिल्लक नसताना अशक्तपणामुळे केवळ सलाईन घेवून हा माणूस या सर्व प्रक्रियेत सक्रीय सहभागी होता. इतिहासात आजवर एखाद्या आंदोलकाचे उपोषण सोडायला निवृत्त न्यायाधीश गेले नसतील परंतु मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडायला स्वतः निवृत्त न्यायाधीश गेले, यामागील मुख्य संकल्पक देखील मंगेश चिवटे हेच आहेत. दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी कायम लढा उभारणारे, प्रहार संघटनेचे प्रमुख आ.बच्चूभाऊ कडू यांच्यासह मंत्रिमंडळातील बहूतांशी मंत्र्यांना या समन्वयामध्ये सहभागी करुन घेण्यामध्ये मंगेश चिवटे यांनी कायम पुढाकार घेतला आहे. काल वाशीमध्ये मराठ्यांचा महाप्रलय उसळला होता. सरकार समोर एकप्रकारे तगडे आव्हान समस्त मराठा आंदोलकांनी निर्माण केले होते. मनोज जरांगे पाटलांनी आंदोलकांसोबत चर्चा करुन अध्यादेशासंबंधी सरकारसमोर काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. याहीवेळी मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब व मनोज जरांगे पाटलांमध्ये समन्वय साधला. याही दरम्यान चिवटेंना भोवळ आली होती. संपूर्ण समाजाने हे पाहिले आहे व अनुभवले आहे. महायुती सरकारने पाटलांच्या सर्व मागण्या काल मान्य केल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सर्व आंदोलकांचे अभिनंदन केले आहे. या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार आणि साथीदार म्हणून ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली ते मंगेश चिवटे आमचे गुरु आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
———————————————————————-
अश्रूंची झाली फुले ! हे आनंदाश्रू सदैव स्मरणात राहतील

मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे – पाटील यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या मराठा आरक्षण लढ्याचा काल विजयी शेवट झाला. प्रामाणिक संघर्षयोद्ध्याला संवेदनशील ‘एकनाथा’ची साथ लाभली आणि शेकडो किलोमीटर पायी चालत आलेले मराठे गुलालाने न्हावून निघाले. या लढ्यात संवाददूत म्हणून काम करण्याची मिळालेली संधी, गुरुवर्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे मार्गदर्शन अन् समाजाच्या जिद्दीच्या जोरावर हा सोनेरी क्षण अनुभवता आला. जेंव्हा विजयाच्या आनंदात आंदोलकांनी अचानकपणे मला खांद्यावर घेऊन जल्लोष करायला सुरुवात केली, तेंव्हा मात्र आनंदाश्रू घळाघळा वाहू लागले.

मंगेश नरसिंह चिवटे
(मा.मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी तथा कक्षप्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी)
———————————————————————–
आज स्व.मेटे साहेब असते तर त्यांनी सरकारचे समाजाच्या वतीने अभिनंदन केले असते !

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांकरिता स्व.विनायकजी मेटे साहेब हे शासन दरबारी नेहमीच आग्रही राहिलेले नेते होते. मराठा समाजाच्या प्रदिर्घ काळातील संघर्षात साहेब स्वतः सामिल होते. म्हणूनच काल जो निर्णय महायुती सरकारने घेतला तेंव्हा मला वाटले आज जर साहेब असते तर त्यांनी शासनाचे समाजाच्या वतीने अभिनंदन केले असते. या आंदोलनात महत्वाची भूमिका निभावलेले मंगेश चिवटे हे देखील मेटे परिवाराचे स्नेही आहेत. त्यांनी शासन आणि आंदोलकांमध्ये सुवर्णमध्य साधला. म्हणून त्यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करते.
ज्योतीताई विनायक मेटे
(शिवसंग्राम प्रमुख, महाराष्ट्र राज्य)
———————————————————————–
चिवटेंमधील संवादकौशल्य याठिकाणी कामी आले
प्रथमतः राज्याच्या आणि मराठा बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेबांनी केली याबद्दल त्यांचे आभार, ज्यांनी हा लढा उभारला व यशस्वी करुन दाखवला त्या मनोज जरांगे पाटलांचे अभिनंदन व हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले त्या मंगेश चिवटे यांचे मनापासून धन्यवाद. मराठा आरक्षणासाठी असलेला लढा हा खूप वर्षांपासूनचा होता, अनेकांनी यासाठी आपल्या प्राणांची आहूती दिली परंतु या सर्व प्रयत्नानंतर अखेर काल विजय मिळाला. मंगेश चिवटे हे सुरुवातीला पत्रकार होते. यामुळे त्यांच्यातील संवाद व समन्वय साधण्याची किमया त्यांना या आंदोलनामध्ये उपयोगी आली. मनोज जरांगे पाटलांसोबत मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील विषयासंदर्भात संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्यावतीने आपल्या विश्वासू आणि अभ्यासू शिलेदाराची नेमणूक केली ते म्हणजे मंगेश चिवटे. मंगेशरावने ही जबाबदारी यथायोग्य पार पाडली व मराठा बांधवांच्या हदयात घर केले.
प्रा.सुरेश नवले
(माजी राज्यमंत्री तथा शिवसेना नेते)
———————————————————————–
मुख्यमंत्री महोदयांनी आज आमच्या देव्हाऱ्यात जागा निर्माण केली
खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनोज जरांगे पाटलांसारखा सच्चा, प्रामाणिक आणि जिद्दी आंदोलक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेबांसारखा सर्व समाजाचे कल्याण करण्याची भावना मनात ठेवणारा नेता मराठा बांधवांना मिळाला. म्हणूनच आमच्या पुढच्या कित्येक पिढ्यांचे कोट कोट कल्याण करणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांनी आज आमच्या देव्हाऱ्यात जागा निर्माण केल्याची भावना आज माझ्या मनामध्ये आहे. मराठा समाजाच्या या लक्ष्यवेधी आंदोलनामध्ये सुरुवातीपासूनच आमचा तरुण सहकारी मंगेश चिवटे रात्रंदिवस झटलेला आम्ही पाहिला. त्याचे कष्ट आम्ही पाहिले आहेत. म्हणूनच एक मोठा भाऊ म्हणून मी त्याचं कौतुक करतो. या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार साहेब यांच्यासह अन्य मंत्र्यांनी देखील खूप सकारात्मक पावलं उचलली. सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नामुळे हा विजय होवू शकला. त्यामुळे सर्वांचेच खूप खूप अभिनंदन.
अर्जुन खोतकर
(माजी राज्यमंत्री तथा शिवसेना नेते)
———————————————————————–
मंगेश चिवटे अभिनंदनास पात्र
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व मनोज जरांगे पाटील यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. याचबरोबर मंगेश चिवटे यांच्या प्रामाणिकपणाचा आणि जिद्दी स्वभावाचा अनुभव या आंदोलनामध्ये आम्ही घेतला. त्यामुळे ते देखील या अभिनंदनास पात्र आहेत. याचसोबत मा.सर्वोच्च न्यायालयाचा पुनर्विचार याचिकेचा निर्णय देखील लवकरच मराठा समाजाच्या बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त करतो. येणाऱ्या शिवजयंतीपर्यंत मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण मिळेल अशी आशा बाळगतो.
– विनोद पाटील
(मराठा नेते तथा मराठा आरक्षण याचिकाकर्ते)
———————————————————————–
धाडस, संय्यम आणि नि:स्वार्थीपणा या तीन गुणांचे एकत्रिकरण म्हणजे मंगेश चिवटे !
प्रथमतः या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री महोदय आणि दोनही उपमुख्यमंत्री महोदयांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. या निर्णयासाठी मंगेश चिवटे या आमच्या मित्राने किती आणि कशाप्रकारे रात्रंदिवस योगदान दिले आहे या संपूर्ण घटनाक्रमांचे आम्ही साक्षीदार आहोत. साहेबांचा निरोप घेवून मुंबईहून पहाटे छ.संभाजीनगरला पोहचत येथून सकाळी ७.०० वा. अंतरवाली सराटीला पोहोचणं. तेथे गेल्यानंतर जरी अराजकीय चेहरा असला तरी सरकारचा माणूस म्हणून आंदोलकांमध्ये असलेल्या भावनांचा आदर करत संय्यमाने आणि धाडसाने वाट काढत मनोज दादांची भेट घ्यायची. त्यांची बाजू ऐकूण घेत मुख्यमंत्री महोदयांची भूमिका मांडत शासन आणि आंदोलकांमध्ये समन्वय साधायचा. एव्हाना हे सर्व होत असताना मंगेश चिवटेंनी अंगी असलेली विनयशीलता आणि नि:स्वार्थीपणा तसूभरही ढळू दिला नाही. म्हणूनच मंगेशरावांच्या या प्रामाणिकपणाबद्दल आणि या धडाकेबाज कामगिरीबद्दल मला एक मित्र म्हणून निश्चितच अभिमान आहे.
– राजेंद्र जंजाळ
(छ.संभाजीनगर जिल्हाप्रमुख, शिवसेना)
———————————————————————–
मंगेश चिवटे यांच्या सकारात्मक भूमिकेचे हे यश
मराठा आरक्षणासाठी मनोज दादा जरांगेंच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या लढ्यामध्ये अगदी सुरुवातीपासूनच मंगेश चिवटे यांनी खूप प्रामाणिकपणे सकारात्मक भूमिका निभावली. मंगेश चिवटे हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू तर आहेतच शिवाय वारंवार संपर्कामध्ये राहून त्यांनी मनोज जरांगे पाटलांचा देखील विश्वास संपादन केला. यामुळे शासन आणि आंदोलक या दोन्हीमध्ये संवाद व समन्वय चिवटे यांना साधता आला. अनेकदा चर्चेमध्ये असताना वडीलकीच्या नात्याने मुख्यमंत्री महोदय व मनोज दादा, मंगेश चिवटे यांच्यावर चिडले असतील परंतु चिवटेंनी कायमच दोन्हीकडील नकारात्मक बाजू बाजूला सारत केवळ सकारात्मकतेने समाजाचे कल्याण करण्याचा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवला. म्हणूनच कालच्या सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयामध्ये चिवटेंचा महत्वाचा वाटा आहे याची इतिहास नोंद घेईल.
अनिल जगताप
(बीड जिल्हाप्रमुख, शिवसेना)
———————————————————————–
मुख्यमंत्री महोदयांशी चिवटेंची असलेली जवळीक एखाद्या महत्वपूर्ण आंदोलनात अशीही उपयोगात येईल असे क्वचितच कोणाला वाटले असेल
गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभ केलं. आंदोलनात लोटलेला महासागर आपण सगळ्यांनी पाहिला आणि अनुभवला. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक तरुण एखाद्या ध्येयाने पेटून उठतो, उद्देश प्रामाणिक असेल तर समाज विश्वास ठेवतो आणि मग मायबाप सरकारलाही आपली दखल घ्यावी लागते, हे सगळं आपण डोळ्यांनी पाहिलं आहे.
आज जेंव्हा मुख्यमंत्री महोदय जरांगे पाटलांना भेटायला आले तेंव्हा टीव्हीवरती त्यांच्यासोबत मंगेश चिवटे हे सुद्धा उपस्थित होते. मंगेश चिवटे वैद्यकीय मदत कक्षामुळे महाराष्ट्राला माहीत झाले. रुग्णसेवेत त्यांनी दिलेले योगदान आपणा सर्वांना ठाऊक आहे. मराठा आंदोलनात अधूनमधून प्रसारमाध्यमांमधून मंगेश चिवटे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला अशा बातम्या येत होत्या. कोणत्याही आंदोलनात सरकार व आंदोलन यामध्ये कोणीतरी अतिशय संवेदनशीलपणे भूमिका निभावणे गरजेचे असते. तसे पाहता ही गोष्ट सोपी नाही. या कामी अनेकदा रोष सहन करावा लागतो. पण मंगेश चिवटे ही भूमिका हळूवारपणे पेलताना दिसत होते. आज मुंबईमधला जल्लोष पाहताना तिथेही स्टेजवर मंगेश चिवटे यांना पाहिले आणि विचार आला दुवा साधणारी अशी चिवट माणसं प्रत्येक आंदोलनात असणे गरजेचे असते. मध्यंतरी मुंबईत भेट झाली तेंव्हा मंगेशजी मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करत होते. त्यांची प्रामाणिकता साधेपणा यावर ते भरभरुन बोलत होते. मंगेशजी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत हे सर्वश्रुत आहे. पण त्यांची ही जवळीकता एखाद्या आंदोलनात अशीही उपयोगी येईल असे क्वचितच कोणाला वाटले असेल. आपण केलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्यासाठी खूप खूप आभारी आहोत.
गणेश शिंदे
(सुप्रसिद्ध व्याख्याते)
———————————————————————–
मंगेशरावांमधील चिवटपणा या ऐतिहासिक विजयाच्या केंद्रस्थानी
जेंव्हापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं, तेंव्हापासून केवळ मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेबच मराठा समाजाला न्याय देवू शकतात हा विश्वास पाटलांच्या मनामध्ये होता. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण होण्याला मंगेश चिवटे यांचे खूप मोठे योगदान आहे, याचे आम्ही साक्षीदार आहोत. शिष्टमंडळात येत असताना मंगेश चिवटे हे शासनाचे प्रतिनीधी म्हणून यायचे परंतु समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जी जी पावलं उचलणं आवश्यक आहे, त्यासाठी ते समाजाचे हितचिंतक म्हणून कायमच आग्रही राहिलेले आहेत. म्हणूनच खूप वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या अन् मराठा समाजाच्या लेकरांकरिता अत्यंत महत्वाच्या प्रश्नाला शासनाने न्याय दिला याबद्दल मी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांनी आमच्यासाठी जिवाची बाजी लावली त्या आमच्या मित्राला देखील मनापासून धन्यवाद देतो.
गंगाधर काळकुटे
(मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू शिलेदार)
———————————————————————–