अक्कलकोटच्या पुरातन श्रीराम मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन – महेश इंगळे
अयोध्येतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर उत्साह

अक्कलकोटच्या पुरातन श्रीराम मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन – महेश इंगळे

अयोध्येतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर उत्साह

२२ जानेवारीला देशभरातील सुमारे चार लाख मंदिरांमध्ये होणार अभिषेक सोहळा.

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि. ९/१/२४)
[SHRISHAIL GAVANDI] अयोध्यातील ऐतिहासिक नुतन श्रीराम मंदिर निर्मितीनंतर येत्या सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी विक्रम संवत २०८०, शालिवाहन शके १९४५, मिती पौष शुक्ल द्वादशी रोजी अभिजीत मुहूर्तावर, मृगाशीरा नक्षत्रात दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना होवून अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा संपूर्ण देशवासियांनी धर्मोत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन केंद्र शासन व राम मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे, कारण २२ जानेवारी रोजी पौष शुक्ल द्वादशी व सोमवार असल्याने हा योग अयोध्येसाठी, श्रीराम भक्तांसाठी व सनातन धर्मासाठी अत्यंत शुभ योग आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिनांक १६ जानेवारी ते २४ जानेवारी अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मंगल क्षणाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरातील ४ लाखांपेक्षा अधिक विविध देवी देवतांच्या मंदिरांमध्येही २२ जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यानिमित्ताने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित स्टेशन रोडवरील पुरातन श्रीराम मंदीरातही मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक, रामनाम जप, सत्संग महिला भजनी मंडळाची भजन सेवा, किर्तन, प्रसाद वाटप, दीपोत्सव इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन संपूर्ण देशात साजरा होणाऱ्या या धर्मोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन महेश इंगळे यांनी केले आहे.
