गावगाथा

तब्बल ४०० किलो गुलाबाची फुले अन् १०० रांगोळीने सजल्या पायघड्या

संत श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत : सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनचा उपक्रम

तब्बल ४०० किलो गुलाबाची फुले अन् १०० रांगोळीने सजल्या पायघड्या

संत श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत : सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनचा उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी

तब्बल ४०० किलो गुलाबाची फुले, १०० किलो रांगोळी तसेच ५० किलो रंगाने पायघड्या सजल्या. संत श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी गुरुवारी सहकारमहर्षी गणपतराव साठे फाउंडेशनतर्फे लष्करमधील जगदंबा चौकापासून उपलप मंगल कार्यालयापर्यंत रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या.

रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरण्याच्या उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. आषाढी एकादशीनिमित्त शेगावहून पंढरपूरकडे निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी गुरुवारी सकाळी कुचन प्रशालेतून उपलप मंगल कार्यालयाकडे मार्गस्थ झाली. याप्रसंगी लष्कर येथील जगदंबा चौकापासून उपलप मंगल कार्यालयापर्यंत सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनतर्फे फुलांच्या आणि रांगोळीच्या नयनरम्य पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या.

गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून सहकारमहर्षी गणपतराव साठे फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी रांगोळीच्या पायघड्या अंथरण्याची तयारी सुरू केली होती. विविध नक्षीकामाची आखणी करून त्यावर पायघड्या अंथरण्यात आल्या. यात सहकारमहर्षी गणपतराव साठे फाउंडेशनच्या तरुणांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.

संत श्री गजानन महाराजांची पालखी जगदंबा चौकात येताच ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात भाविकांनी पालखी मार्गावर स्वागत केले. यावेळी फाउंडेशनकडून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच उपस्थित हजारो भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, दीपक पाटील, अभिजीत काळे, विशाल कल्याणी, किरण पाटील, भैय्या माने, गणेश तुपदोळे, आशिष परदेशी, अल्फरान आबादीराजे, गजानन थोरात, स्वप्नील कांबळे, गजानन कदम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button