श्री गणेशा प्रमाणे स्वामी भक्तीतही कसर सोडत नाही – संजीव जावळे
वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट

श्री गणेशा प्रमाणे स्वामी भक्तीतही कसर सोडत नाही – संजीव जावळे

पुण्याचा रहिवासी असून गणेश भक्तीस व गणेशोत्सवास पुणे शहरात विशेष महत्त्व आहे, कारण सार्वजनिक गणेशोत्सवाचा व हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती स्थापना करण्याचे भाग्य आमच्या पूर्वजांना लाभले आहे. त्यात आम्हा पुणेकरांचे गणेश भक्तीवर विशेष प्रेम आहे. असे असले तरी ब्रम्हांडनायक स्वामी समर्थांच्या स्मरणातही आम्ही खूप वेळ व्यतीत करीत असतो. कारण गणपती हे प्रथम पूजेचे मानकरी असले तरी श्री स्वामी समर्थ हे या विश्वाचे ब्रम्हांडनायक आहेत. मी व माझे कुटुंबीयही श्री गणेशा प्रमाणे स्वामी भक्तीही अत्यंत मनोभावे करीत असतो. त्यामुळे आम्ही गणेश भक्ती प्रमाणे स्वामी भक्तीतही कसर सोडत नसल्याचे मनोगत पुणे येथील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या भारतातील पहिल्या सार्वजनिक गणपती ट्रस्टचे संस्थापक व भाऊ लक्ष्मणराव जावळे उर्फ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या चौथ्या पिढीचे वंशज संजीव जावळे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी संजीव जावळे यांचा वटवृक्ष मंदिरात स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सपत्निक सत्कार केला. यावेळी जावळे बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, व्यंकटेश पुजारी, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, मोहन जाधव, महादेव तेली, सचिन हन्नुरे, अभिषेक गोगी आदिसह स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – संजीव जावळे यांचा वटवृक्ष मंदिरात सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
