*सचिन बेंडभरांसारखे साहित्यिक शिरूर मधून तयार होत असल्याचा अभिमान* गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांचे प्रतिपादन
सचिन बेंडभर यांचा सन्मान करताना शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर

*सचिन बेंडभरांसारखे साहित्यिक शिरूर मधून तयार होत असल्याचा अभिमान*
गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांचे प्रतिपादन
ता.02 ( पुणे प्रतिनिधी )
शिरूर तालुक्यातील शिक्षक हे साहित्य क्षेत्रातही कार्यरत असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. वाबळेवाडी शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांची आजपर्यंत 57 पुस्तके प्रकाशित असून वयापेक्षा जास्त साहित्य संपदा स्वतःच्या नावावर असलेल्या बेंडभर यांची सहावीच्या अभ्यासक्रमात कळो निसर्ग मानवा ही कविता आहे. इतकेच नव्हे तर मामाच्या मळ्यात हा त्यांचा काव्यसंग्रह पुणे विद्यापीठाच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमात आहे, ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ शिरूर येथील सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर मध्ये नुकताच पार पडला. यावेळी महावाचन उत्सव 2025 या कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना पंचायत समिती शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, शिरूर ही साहित्यिकांची भूमी आहे. ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यादेखील शिरूरच्याच आहेत. नवीन पिढीतून अनेक ताकदीचे लेखक तयार होत आहेत. विशेषत: ते शिक्षकच आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. याच पिढीमधून बेंडभरांसारखे साहित्यिक तयार होत आहे, ही शिरूरच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. शिवाय व्याख्यानांच्या माध्यमातून शिरूरमधील शाळांमधून ते बालकवी घडवीत आहेत, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. यातून नव्या पिढीतून अनेक कवी लेखक तयार होतील असा आशावाद वाटतो.
*चौकट*
विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी वाचन केले पाहिजे. वाचनाने जीवन समृद्ध होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाचन लोप पावत चालले असताना आपण सर्वांनी सुरू केलेली महावाचन चळवळ विद्यार्थ्यांना प्रेरणा देवून अधिक वृद्धिंगत होईल, याची खात्री वाटते.
– बाळकृष्ण कळमकर
– गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिरूर.
————-
*फोटो :*
ओळ : सचिन बेंडभर यांचा सन्मान करताना शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर
