तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराच्या बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठात गुरुपौर्णिमेनिमित्त महापूजासह हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप,
गुरुपौर्णिमा विशेष

अक्कलकोट, दि. २१- तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराच्या बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठात गुरुपौर्णिमेनिमित्त महापूजासह हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप, भजन संध्या आणि प्रवचनासह विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. श्री स्वामी समर्थांच्या समाधी मठांमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील समाधी मठ श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीसह संपूर्ण गाभाऱ्याला आणि मंडपाला विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
भाविकांनी पहाटेपासूनच मठात दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण मठात केलेली आकर्षक फुलांची सजावट ही लक्षवेधी ठरत होती.


प्रारंभी पहाटे साडेचार वाजता मोठ्या मंगलमय वातावरणात काकड आरती करण्यात आली. त्यानंतर लघुरुद्र अभिषेक करण्यात आले. सकाळी साडे दहा वाजता वस्त्रालंकार करण्यात आले. दुपारी बारा वाजता महापूजा करण्यात आले. यावेळी महानैवेद्य आरती ( धुपारती) करुन भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यास सुरुवात करण्यात आले. श्री चोळप्पा महाराज यांचे वंशज परम श्रद्धेय श्री अनिल पांडुरंग महाराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप अनिल महाराज पुजारी परिवार यांच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मठ परिसरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद देण्यात येत होता. सदरची महाप्रसाद वाटप सुमारे तीन तास पर्यंत चालली होती.
आलेल्या प्रत्येक भाविकांना महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आले असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत होती.
दिवसभर सुमारे १५ हजारहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचे संयोजक अनुप महाराज पुजारी यांनी बोलताना सांगितले.

प्रामुख्याने येथील स्वामींच्या समाधी मठामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत आपले गुरु स्वामींच्या चरणी लीन होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. यंदाच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. मठ परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. पूजा साहित्य, प्रतिमा व प्रसाद विक्री मोठ्या प्रमाणात झाले असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण होते.

या मठामध्येही सोलापूरसह पुणे, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, बीड, लातूर, उस्मानाबाद, सांगली, रत्नागिरी, वाशिम, यवतमाळ, कोकण भाग आदि जिल्ह्याच्या विविध भागातील भाविकांनी भर पावसात चिंब होऊन हजेरी लावली. तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा राज्यातील भाविकांची गर्दी सुध्दा लक्षणीय होती.

सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुप महाराज, संदेश महाराज व समस्त पुजारी परिवार, सेवाभावी सदस्य, सेवेकरी भक्त मंडळी आदिनी परिश्रम घेतले.
चौकट —
मूळ पुरुष श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परम भक्त श्री चोळप्पा महाराज यांनी सुरू केलेली श्री गुरु महाप्रसाद वाटप सेवा गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आम्ही अखंडीतपणे सुरू ठेवली आहे. स्वामी समर्थ महाराज यांचे सेवा करत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री गुरु महाप्रसाद वाटप ची परंपरा असेच निरंतरपणे सुरू ठेवणार आहे.
– अनुप महाराज पुजारी,
( श्री चोळप्पा महाराज यांचे वंशज )