गावगाथा

मंगरूळे प्रशालेच्या शैक्षणिक वर्ष १९८७-८८ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

स्नेह संमेलन

अक्कलकोट, दि. ३१- येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी संचलित मंगरूळे प्रशालेच्या शैक्षणिक वर्ष १९८७-८८ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, व्यापार, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे.

सकाळी ९ वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले.

यानिमित्ताने व्हाट्सअप व फेसबुक मुळे एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत रमून गेले होते. प्रत्येकजण आपले मित्र व मैत्रीण कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होते. आपले जुने वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. जवळ जवळ ३६ वर्षांनी सर्व वर्ग मित्र एकत्र आल्याचे पाहून खूप आनंद झाला होता. सर्वांनी परिचय देताना सध्या काय करतात व कौटुंबिक माहिती सविस्तरपणे दिली.

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे संचालक तथा प्रसिद्ध आडत व्यापारी चंद्रकांत स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.

तसेच,अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्रीशैल भरमशेट्टी म्हणाले, ‘‘या मेळाव्यामुळे आम्हाला एक नवी दिशा मिळाली आहे, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करून विविध भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच या वेळी प्रत्येकवर्षी दिवाळी ते मकर संक्रांतीच्या दरम्यान शाळेतील या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा संकल्प जाहीर केले.

मेळाव्याचे नियोजन राहुल पाटील, सुनिल आडवितोट, कलावती जवळगी व महानंदा हत्तुरे यांनी केले होते. तर कलावती जवळगी व महानंदा हत्तुरे यांनी सर्वांना एकत्रित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे सदरचा मेळावा तब्बल दहा तास चालला होता. मेळाव्याची सांगता सुरुची भोजनाने झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बसवराज दुधनी यांनी केले. शेवटी सुनील आडवितोट यांनी आभार मानले.

या स्नेह मेळाव्यास खेडगी महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख सुहास होटकर, सुनिल आडवितोटे, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक बी. टी. राठोड, संजय अडवितोटे, सुनील अल्लोळी, कलावती जवळगी, अंजली मंगरूळे, गौरी मंगरूळे, कल्पना किरनळी, पुष्पा कलमनी, हेमा पाटील, सुरेखा कलमनी, महानंदा हत्तूरे, विरुपाक्ष कुंभार आदि उपस्थित होते.

चौकट —
माजी विद्यार्थ्यांचा मराठी, हिंदी व कन्नड चित्रपटातील जुन्या व नव्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विशेषतः गाण्यांचा कार्यक्रम विद्यार्थी विरुद्ध विद्यार्थिनी असे रंगलेला होता. तर बसवराज दुधनी यांनी सकारात्मक विचार व कुसुमाग्रज यांच्या कविता सादर करुन उपस्थितांचे मने जिंकून घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button