गावगाथाठळक बातम्या

PCMC : चार दिवसांत शहरातील सर्व खड्डे बुजवा ; खासदार श्रीरंग बारणेंचा अधिकाऱ्यांना सूचना

निगडी (प्रतिनिधी): शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहतूक संथ होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शहरातील रस्त्यांवरील खड्डे चार दिवसात बुजविण्याचे आदेश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. वाहतूक कोंडी होणा-या ‘स्पॉट’वर, चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी संदर्भात खासदार बारणे यांनी शनिवारी (दि.3) महापालिका अधिकारी, पोलिसांची एकत्रित बैठक घेतली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, वाहतूक पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, प्रेरणा शंकर, देवण्णा गट्टूवार, सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे, निगडीचे वाहतूक पोलीस निरीक्षक शंकर बाबर, वाकडचे सुनील पिंजन, वाहतूक सल्लागार प्रताप भोसले यावेळी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावरील खड्डे हे वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण आहे. खड्ड्यामुळे वाहनांचा वेग संथ होत आहे. त्यासाठी कोल्ड मिक्स, खडी, पेव्हिंग ब्लॉक, सिंमेंट कॉन्क्रीटने येत्या चार दिवसात सर्व खड्डे बुजविण्यात यावेत. पिंपरीतील साई चौक, वाकडमधील लक्ष्मी चौक, हिंजवडी आयटी पार्कमधील सुर्या हॉस्पिटल, भूजबळ, भूमकर चौकडून येणारी वाहतूक वाकडकडे वळविली आहे. त्यामुळे तिथे मोठी वाहतूक कोंडी होते. डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटल दरम्यान दोन्ही बाजूने कोंडी होते. रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड हा झपाट्याने विकसित होणारा भाग आहे. महापालिकेला या भागातील नागरिकांकडून मोठा मालमत्ता कर मिळतो. पण, त्या कराच्या तुलनेत नागरिकांना सेवा मिळत नाहीत. त्यामुळे कराच्या 40 टक्के रक्कम या भागातील विकास कामांवर खर्च करावी.

किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपासमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा डीपीआर मंजुरीसाठी पाठविला आहे. परंतु, जुना ठेकेदार (रिलायन्स) उच्च न्यायालयात गेल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने 12 मीटर आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 12 मीटरचा सेवा रस्ता विकसित करावा. जेणेकरुन या रस्त्यावरुन नागरिक ये-जा करतील. त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होईल अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली. याबाबत एनएचआयच्या अधिकारी बाळासाहेब टोंक आणि कदम यांनाही सूचना केल्या आहेत. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची या कामासाठी मंगळवारी पुन्हा भेट घेणार असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button