Pune | Solapur Suicide | “व्हॅलेंटाईन डे” च्या दिवशी सोलापूरच्या तरुणाचा पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या

चिंचवड (प्रतिनिधी): “व्हॅलेंटाईन डे” च्या उत्सवी वातावरणात आकुर्डी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील समर्थ संजय माळी हा काही दिवसांपासून गुरुद्वारा कॉलनी भागात मित्रांसोबत वास्तव्यास होता. दुपारच्या सुमारास मित्र जेवणासाठी बाहेर गेले असताना तो खोलीत एकटाच होता. त्याच वेळी त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मित्र परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली असून चिंचवड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पुढील प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
प्रेमसंबंधातून नैराश्य आल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात असली तरी पोलिसांकडून अद्याप अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



