*पुस्तकाचे नाव -* कांदळवन (कुमार कादंबरी)
*लेखक :* मदन हजेरी
*प्रकाशक*- स्पर्श प्रकाशन, राजापूर
*पृष्ठे* – 40
*मूल्य* – 120 रूपये
*समीक्षक -* संजय ऐलवाड
_____________________________
*निसर्गाची अद्भभूत नयनरम्य सहल : कांदळवण*
मानवी जीवनात निसर्गाला विशेष महत्त्व आहे. मुळातच मानवाचा संबंध प्रवास हा निसर्गाच्या साक्षीने झाला आहे. मात्र अलीकडच्या काळात मानव निसर्गापासून दूरावत चालला आहे की काय? अशी शंका येते. निसर्ग हा मानवासाठी प्रचंड उपयुक्त आहे. किंबहुना निसर्गाविना मानवी आयुष्य निरर्थक आहे. याचीच जाणीव ज्येष्ठ लेखक मदन हजेरी यांनी कांदळवण या कुमार कादंबरीतून वाचकांना करून दिली आहे.
बाल साहित्यात कुमारांसाठीचे साहित्य संख्येने कमीच आहे. त्यातल्या त्यात सकस साहित्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र हजेरी यांची ही कादंबरी कुमारांना कोकणातील अद्भभूत निसर्गाची नयनरम्य शाब्दीक सहल घडवून आणणारी आहे. ही कादंबरी केवळ कोकणातील निसर्गांची, नद्यांची, खाड्यांची, नदी, खाडीतील जलचर किंवा मासेमारीसाठी वापरण्यात येणार्या साधनांची ओळख करून देत नाही, तर कोकणातील गावांची रचना, बोलीभाषा, पेहराव, खाद्यपदार्थ, व्यक्ती, त्यांचे स्वभाव, नाते आणि येथील जनजीवन निसर्गांशी कसे एकरूप आहे, याची प्रचिती देते. निसर्गातील वनस्पती, त्यांची मानवी जीवनातील उपयुक्तता, झाडा, झुडुपांना येणारी फळे, विशिष्ट माती तसेच दगडाची वैशिष्ट्ये. आणि सर्वांत महत्त्वाचे एकमेकांविषयी असलेली अपुलकीचे सर्वांगसुंदर दर्शन या कादंबरीत घडते.
बालक आणि कुमारांसाठी उन्हाळी सुट्ट्या आणि गाव हे समीकरण आहे. या कुमार कादंबरीची सुरूवातही सुट्ट्यांपासून होते. मुंबईतून गावात आलेल्या आणि मुळ गावातल्या अशा तीघांची ही गोष्ट आहे. मुळात गावातल्या कुमारांना शिवार, निसर्ग पहायचा असतो. मग तो मुंबईहून आलेल्या दोघांना निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येण्याचे निमंत्रण देतो. आणि तेथूनच या कादंबरीची समृद्ध अशी निसर्ग सहल सुरू होते. एक एक पापुद्रा उलगडत जावा, त्याप्रमाणे तेथील निसर्ग डोळ्यासमोरून तरळून जातो. काही वेळा तेथील निसर्गाविषयी वाचकंच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण होते, तर काही वेळा कादंबरीतील घटना आणि वर्णने मनात घर करून जातात. जेव्हा कादंबरी वाचनाच्या अंतिम टप्प्यात येते, तोपर्यंत संपूर्ण निसर्ग डोळ्यात आणि मनात साठलेला असतो. वाचक आहे त्या ठिकाणीच असतो. मात्र मन संपूर्ण कोकणाची सफर करून येते. ही या कादंबरीची आणि लेखकाच्या लेखनीची ताकद आहे.
या आधीही विविध प्रकारच्या साहित्यातून कोकण वाचकांच्या भेटीला आला आहे. मात्र मदन हजेरी यांनी कुमार कादंबरीच्या माध्यमातून जो निसर्ग शब्दांत मांडला आहे. त्याची ताकद अफाट आहे. त्यामुळे इतक्या प्रभावीपणे बाल किंवा कुमार साहित्यात कोकणातील निसर्ग मांडला गेला नव्हता हे सत्य आहे. मुळात हजेरी यांच्याकडे अनुभवाचा समृद्ध खजिना आहे. त्यात त्यांची लेखनी दीर्घायुषी आणि दीर्घानुभवी आहे. त्यामुळे कुमार कादंबरी सकस आणि ज्ञानवर्धक झाली आहे. कांदबरीच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचकांना खिळवून ठेवण्याची जादू प्रत्येक शब्दांत, ओळीत आणि पानात आहे. वाचक शेवटच्या पानापर्यंत कधी येतो, याचे भानही वाचकांना रहात नाही. हे लेखकाच्या लेखनीचे सर्वात मोठे यश आहे.
अत्यंत साधी, सोपी भाषा, वाचकांच्या आकलन सुलभतेसाठी प्रमाण भाषेचा वापर, कुमारांना समजेल, अर्थांचा उलगडा होईल अशी भाषिक रचना, प्रसंगाला साजेशे रेखाटने, अत्यंत बोलके आणि प्रभावी मुखपृष्ट, आणि आशयघन प्रसंग आदीमुळे ही कुमार कादंबरी वाचनीय झाली आहे. या कादंबरीतील कुमारांच्या माध्यमातून येणारा निसर्गानुभव खरोखर मनाला आनंद देणारा आहे. या कादंबरीचा शेवट मात्र मनाला चटका लावणारा आहे. कारण दिवस कोणासाठीच थांबत नसतात. काही काळासाठी एकत्र आलेले मित्र कालांतराने दूरावत असतात. हा ही निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे निसर्गानुभवासह निखळ मैत्रींचा संगम या कादंबरीत अनुभवता येतो. एका सुंदर कुमार कादंबरीबद्दल मदन हजेरी सरांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि लेखनीला खुप सार्या शुभेच्छा..!
——————————-
*समीक्षक -* संजय ऐलवाड
कोषाध्यक्ष,
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!