साहित्यातून मुलांचे वैचारिक कुपोषण थांबावे -बालकुमारच्या ह. मो. मराठे कथालेखन कार्यशाळेला सुरुवात
कार्यशाळा

साहित्यातून मुलांचे वैचारिक कुपोषण थांबावे
-बालकुमारच्या ह. मो. मराठे कथालेखन कार्यशाळेला सुरुवात
पुणे : साहित्यातून मुलांना माहिती देताना सामाजिक जीवनातील अनेक गोष्टी त्यांना समजतील की नाही, म्हणून लेखक बऱ्याच वेळा काही गोष्टी सांगतच नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा माहितीपासून मुले वंचित राहतात. मुलांना सर्वार्थाने सक्षम बनविण्यासाठी समाज जीवनातील सर्वच गोष्टी कळाल्या पाहिजेत, तरच साहित्यातून मुलांचे होणारे वैचारिक कुपोषण थांबेल, असे मत जेष्ठ अभ्यासिका डॉ. मुक्तजा मठकरी यांनी रविवारी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था व डॉ. अमृता मराठे यांच्यातर्फे मुलांसाठी ज्येष्ठ साहित्यिक, संपादक ह. मो. मराठे कथालेखन कार्यशाळा व स्पर्धेचे डहाणूकर कॉलनीतील सरस्वती विद्या मंदिर शाळेत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत ‘कथा स्वरूप व वैशिष्ट्ये’ या विषयावर मठकरी यांनी मुलांना मार्गदर्शन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड, डॉ. अमृता मराठे, वैदेही इनामदार तसेच कार्यकारिणी सदस्य आदी उपस्थित होते.
मठकरी म्हणाल्या, “साहित्यातून मुलांना समाज जीवन कळण्यास मदत होते. मुले जे वाचतील त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे एखादी गोष्ट मुलांना आत्ताच सांगायला नको. त्यांना आत्ता समजणार नाही, कळणारच नाही असे समजण्याचे कारण नाही. त्यांना सर्व गोष्टींची माहिती साहित्यातून मिळाली पाहिजे अशी अपेक्षा मठकरी यांनी व्यक्त केली.
कथा छोटी असावी. त्यात नावीन्य असावे. कथेतील नावीन्य हे साहित्य कालातीत करत असते. कथेत जाणिवांचा विस्तार झाला, की कथा अधिक फुलत जाते. वाचकांच्या मनालाही भिडत असते. कथेत सूचकता महत्त्वाची असते. लेखक कथा ठरवून लिहितो. त्यामागे त्यांचा प्रचंड अभ्यास आणि अनुभव असतो. वाचकांना कथेतील रिकाम्या जागा वाचता आल्या पाहिजे, कारण त्या जागा अर्थपूर्ण असतात. लेखक कायम प्रश्न विचारत असतो. ते प्रश्न वाचकांना वाचता आले पाहिजे” असेही मुक्तजा मठकरी यांनी सांगितले. डॉ. अमृता मराठे यांनी प्रास्ताविक केले. वैदेही इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.
*चौकट*
धुवादार पावसात रंगली कार्यशाळा सकाळपासून शहरात धुवाधार पावसाला सुरुवात झाली. अशा पावसातही शहराच्या विविध भागातून मुले कथालेखन कार्यशाळेसाठी हजर झाले. त्यामुळे बाहेर धुवाधार पाऊस आणि डहाणूकर कॉलनीतील सरस्वती विद्या मंदिरात कथालेखन कार्यशाळेत मुले मग्न! असे दृश्य होते.
मुले कथा, कथेचे सूत्र, कथेतील पात्र, वातावरण निर्मिती, भाषा, प्रसंग आधी गोष्टी समजून घेत होते. मुलांसोबत पालक, शिक्षक आणि साहित्यिकही या कथालेखन कार्यशाळेत रमले होते.
