गावगाथाठळक बातम्या

Pune : चूक म्हणजे नव्या विचाराची संधी  – राजीव तांबे यांचे प्रतिपादन

पुणे : चुकीशिवाय कोणतीही गोष्ट शिकता येत नाही. त्यामुळे चूक म्हणजे ‘चूक’ नाही, तर तो वेगळा विचार आहे; कारण चूक ही शिकण्याची संधी आहे. चूक म्हणजे अपयश नाही, तर नव्या विचाराची सुरुवात असते. असे मत प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था व डॉ. अमृता मराठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जेष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे कथालेखन कार्यशाळा व स्पर्धेत ‘मराठी भाषिक खेळ आणि लेखन कौशल्य’ या विषयावर तांबे बोलत होते. या वेळी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड, कार्यकारिणी सदस्य सचिन बेंडभर, डॉ. अमृता मराठे, पल्लवी इनामदार, वैदेही इनामदार, नरहरी अत्रे, पालक, शिक्षक आणि बालसाहित्यिक उपस्थित होते. ही कार्यशाळा डहाणूकर कॉलनीतील सरस्वती विद्या मंदिर शाळेत पार पडली.

राजीव तांबे म्हणाले, आव्हानाशिवाय यश नाही. निर्मिती सर्जनशीलतेचे पहिले लक्षण आहे. शब्दाला अर्थ नसतो. मात्र वाक्यात विरामचिन्ह खूप महत्त्वाचे असते. आरोह आणि अवरोह यामुळे वाक्याचा अर्थ बदलतो. प्रत्येक गोष्टीचा अर्थ सृष्टीत लपलेला असतो. तो अर्थ समजून घेतला पाहिजे. विचार करताना किंवा लेखन करताना उदाहरणाच्या मागे गेल्यास सर्जनशीलता संपते. म्हणून उदाहरणाऐवजी सूचनांचा विचार केला पाहिजे. नवीन शब्द तयार करता आले, की प्रत्येक वेळी वेगळा विचार मंडता येतो. अनुभवातून निर्माण झालेली गोष्ट परिपूर्ण असते. असेही तांबे यांनी नमूद केले.

या कार्यशाळेत तांबे यांनी शब्द आणि वाक्यातील गंमत मुलांना समजावून सांगताना शब्दांचे खेळ व खेळाची कृती मुलांकडून करून घेतली. तसेच कथा कशी लिहावी, शब्द निर्माण कसे करावे? वातावरण निर्मिती कशी करावी? कथेचे स्वरूप, कथेतील पात्र, प्रसंग आदी विषयी मार्गदर्शन केले.

पल्लवी इनामदार यांनी मला आवडलेली कथा या विभागात द. मा. मिरासदार यांची ‘भूताचा जन्म’ ही कथा सांगितली. तसेच कथा का आवडली याची करणेही मुलांना सांगितली. वैदेही इनामदार यांनी प्रास्ताविक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button