जीवन कृतार्थतेकरीता जीवनात गुरु महत्वाचे – ह.भ.प.श्रीपाद महाराज मुळे
श्रीकृष्णांनी भगवद् गीतेतून हाच उपदेश दिलेला आहे.

जीवन कृतार्थतेकरीता जीवनात गुरु महत्वाचे – ह.भ.प.श्रीपाद महाराज मुळे
श्रीकृष्णांनी भगवद् गीतेतून हाच उपदेश दिलेला आहे.
गोपाळ काल्याने वटवृक्ष मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सवाची सांगता.
(श्रीशैल गवंडी, दि.२७/८/२४) – आपल्या जीवनातील अंधकार दूर करून चिंतामुक्त जीवनाची वाट दाखवून जीवन कृतार्थ बनवतात ते फक्त आपले गुरुच असे प्रतिपादन श्री क्षेत्र गोंदी (जि.जालना) येथील ह.भ.प. श्रीपाद महाराज मुळे यांनी केले. ते श्रावणमास व गोकुळ अष्टमी निमीत्त श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या ज्योतिबा मंडप येथे दिनांक – २०/८/२०२४ ते दिनांक – २७/८/२४ अखेर आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत गीता कथा निरूपण सेवेच्या तिसऱ्या सप्ताहात निरूपण करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या शुभारंभी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी श्रीपाद महाराज यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला.
पुढे बोलताना श्रीपाद महाराज यांनी सदगुरु आत्मज्ञान देवून आपल्या चिंता नष्ट करून टाकतात. गुरुस्वरुप हे मोठे निश्चल असून ते कधीच नाश पावत नाही. गुरुस्वरुपाची ओळख झाल्याशिवाय जीवनाची पुर्णता नाही. समस्त मानव जातीस मार्गदर्शक असलेले भगवान गोपालकृष्ण यांनीसुध्दा सांदोपनी ऋषींना गुरु करुन घेतले कारण प्रत्येक जीवाची पुर्णता ही सदगुरुच्या सान्निध्यातच आहे. जीवनरुपी महासागरात पोहणाऱ्या शिष्याला योग्य वेळी शिकविणारा आणि कालांतराने त्यास आध्यात्मिक पातळीवर जलतरणपटू बनविणारे सदगुरुच असतात. मनुष्य जीवनातील सुख हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून असतं. ज्याच्याजवळ चांगले विचार तिथे सुख असणारच हे निश्चित आणि चांगले विचार हे सदगुरुंच्या सान्निध्यातच सुचतात. मानसिक दारिद्रयाने पिचलेल्या मानव समाजाला आत्मशांती प्रदान करून सन्मार्गावर चालविणे हेच महात्म्यांच्या अवताराचं उद्दीष्ट असतं. आध्यात्म म्हणजे अंतर आत्म्याच्या संकेतानुसार चल व अचल जीवसृष्टीशी सकारात्मक दृष्टीने व्यवहार करणे होय. मानव जीवामध्ये सुप्त असणारे गुण पंचइंद्रियाद्वारा उर्जित अवस्थेत आणून सकारात्मक विचारात बदल करण्याची किमया फक्त सदगुरुच करु शकतात, यासाठी भगवान गोपालकृष्णाचं जीवन चरित्र सर्वांना प्रेरणादायी आहे. श्रीकृष्णांनी भगवद् गीतेतून हाच उपदेश दिलेला आहे.
सदगुरुंच्या कृपेने जीवन परिपूर्ण होवून आपलं जीवन इतरांसाठी प्रसादरुप बनतं यालाच गोपाळकाला म्हणतात, म्हणून आपले जीवन इतरांसाठी गोपाळकाल्याचा प्रसाद बनावा असेही विवेचन मुळे यांनी या कीर्तन सेवेच्या माध्यमातून केले. त्यांना हार्मोनियमवर ओंकार पाठक, तबल्यावर अक्षय सरदेशमुख, नितीन दिवाकर यांनी साथसंगत केली. आज गोपाळकाला रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन व त्यानंतर दहीहंडी फोडून गोकुळ अष्टमी उत्सवाची सांगता झाली. यानंतर सर्व उपस्थित असलेल्या हजारो भाविकांना देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे भोजन महाप्रसाद देण्यात आले. याप्रसंगी चेअरमन महेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संतोष पराणे, कौशल्या जाजू, सुरेखा तेली, श्रीपाद सरदेशमुख, प्रशांत गुरव, अनंत पाटील, अक्षय सरदेशमुख, सागर गोंडाळ, गिरीश पवार, प्रसाद सोनार, महादेव तेली, श्रीशैल गवंडी, अमर पाटील, विपुल जाधव गिरीश पवार महेश काटकर महेश मस्कले स्वामीनाथ मुमूडले, संतोष जमगे आदींसह हजारो भाविकांनी उपस्थित राहुन कीर्तनसेवा, भोजन महाप्रसादसह इतर धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.

फोटो ओळ – जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त कीर्तनसेवा सादर करताना व दहीहंडी फोडताना ह.भ.प.श्रीपाद महाराज मुळे व अन्य दिसत आहेत.
