बेला शेंडे यांच्या सुरांनी गाजली अक्कलकोटची संगीत रजनी
स्वामी अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा; गायिका बेला शेंडे यांच्या संगीत रजनीला भरघोस प्रतिसाद

स्वामी अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा; गायिका बेला शेंडे यांच्या संगीत रजनीला भरघोस प्रतिसाद

अक्कलकोट (प्रतिनिधी):
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या महोत्सवात गुरुवारी ‘संगीत रजनी’ अंतर्गत सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यक्रमाने चौथे पुष्प अर्पण झाले.


या भावपूर्ण संगीत रजनीत “श्री स्वामी समर्थ”, “पांडुरंगा”, “मन मोहना”, “धुंद वाटेवर” यांसारख्या मराठी व हिंदी भक्तिगीते व भावगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमस्थळी रसिकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

दीपप्रज्वलन आणि मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, उद्योजक गिरीश कणेकर, सोलापूर विद्यापीठाचे आर.आर.सी. मेंबर डॉ. तानाजी कोळेकर, तसेच अनेक मान्यवर डॉक्टर, वकिल, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते. श्रींची, नटराज आणि लता मंगेशकर यांची पूजन विधीही भक्तिभावाने पार पडली.

कलावंतांचा व सेवेकऱ्यांचा गौरव
या कार्यक्रमात गायक सौरभ दप्तरदार, मथुरा गद्रे, विक्रम भट, अभिजित भदे, ऋतुराज कोरे, अमान सय्यद, अमित गाडगीळ, विशाल शेलकर, मोहित नामजोशी, मोहिर अटकलकर यांच्यासह अनेक मान्यवर कलावंतांचा सत्कार करण्यात आला. पूजन विधी न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांनी मंत्रोच्चारासह पार पाडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. उत्कृष्ट लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केली आणि मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी आकर्षकपणे सजवला.
गुणीजन गौरव पुरस्कार
न्यासाच्या वतीने अक्कलकोट येथील डॉ. गिरीश साळुंखे, डॉ. बाबासाहेब व्हनमाने, पोलीस निरीक्षक निलेश बागाव, अश्विनी बाभळसुरे, पत्रकार महादेव जंबगी यांना “गुणीजन गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी गौरव
तालुक्यातील १०वी व १२वी परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या सहा विद्यार्थ्यांना न्यासाच्या वतीने गौरविण्यात आले.
व्याख्यानाचे आयोजन
शुक्रवार, दि. ४ जुलै रोजी संध्याकाळी ७ ते ९.३० वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे “छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे.
कलावंतांचा आनंददायी अनुभव
या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल गायिका बेला शेंडे यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले,
“स्वामी अन्नछत्र मंडळाच्या ३८ व्या वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सवात मला व माझ्या टिमला सहभागी होण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे. या पवित्र कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा!”