Akkalkot: सौ सुरेखा कल्याणशेट्टी प्रशालेत हिंदी दिन उत्साहात साजरा

अक्कलकोट (प्रतिनिधी ): महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व सेमी इंग्रजी विद्यालय यांच्यावतीने शनिवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी दिवस सप्ताह उपक्रमाचे समारोप कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी हे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक सुर्यकांत रुगे, तसेच सेमी विभागाचे पर्यवेक्षक दिगंबर जगताप हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात थोर हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

यामध्ये निबंध, लेखन स्पर्धा, मुहावरे, कहावते लेखन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, विज्ञापन प्रस्तुतीकरण स्पर्धा, त्या अनुषंगाने यशस्वी विद्यार्थ्याना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी समूहनृत्य आणि हिंदी भाषेचे महत्त्व समजून सांगणारे नाटक सादर केले. शेवटी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख कल्पना स्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी शिक्षिका मनिषा दुधभाते यांनी केले.तर सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी संस्कृती जोजन हिने केले तर आभार सौ. थोरात यांनी मानले.
