इंगळे तंत्रनिकेतनच्या वार्षिक स्वामीटेक अंकाचे वटवृक्ष मंदीरात प्रकाशन ; स्वामींच्या गाभाऱ्यात महेश इंगळेंच्या हस्ते थाटात प्रकाशन

अक्कलकोट (प्रतिनिधी): श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे तंत्रनिकेतनच्या सन २०२३-२४ या सालाचे स्वामीटेक या वार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते कै.कल्याणराव इंगळे महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे व विश्वस्त मंडळ, प्रमुख अतिथी, उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमूख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वामींच्या साक्षीने स्वामींच्या गाभाऱ्यात प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी वार्षिकांक हा संस्थेचा खरा चेहरा आहे. तो ग्रामीण भागातील एन.बी.ए.मानांकित एकमेव संस्था असून विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देणारी व त्यांना घडवणारी तंत्रनिकेतन म्हणून नावारूपास येत आहे. अशा गौरवास्पद शब्दरुपी सुमनाने चेअरमन महेश इंगळे यांनी वार्षिकांक समितीनी केलेल्या कामाची पोचपावती दिली. तंत्रज्ञानासोबतच इतर क्षेत्रात विद्यार्थी नावारूपास यावेत म्हणून वार्षिकांक प्रकाशन आवर्जून प्रत्येक वर्षी आम्ही करत आहोत असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे सरांनी यावेळी व्यक्त केले. वार्षिकांक स्वामीटेक २३-२४ ही संस्थेची माहिती समाजापर्यंत पोहोचवणारी, संस्थेच्या प्रत्येक घटकातील सुप्त कलागुणांना वाव देणारी व वाचनातून प्रगतीची वाट दाखवणारे माध्यम आहे.

तसेच आज प्रकाशन झाल्याबद्दल खूप आनंद होत असून प्रकाशन सोहळ्यास उपस्थित असलेले चेअरमन, विश्वस्त, प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वार्षिकांक चे संपादक प्राध्यापक श्री राजरतन बाणेगाव यांनी आभार व्यक्त केले. त्याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, प्रथमेश इंगळे, विपुल जाधव, दर्शन घाटगे, तुषार मोरे, धनराज स्वामी, श्रीकांत मलवे, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.
