Nigdi : निगडी – आकुर्डी बीआरटी रस्ता कायमचे बंद होण्याची शक्यता ; मेट्रोच्या पोलमुळे मार्गात अडथळा
निगडी (प्रतिनिधी): मेट्रोसाठी खांब उभारल्यानंतर रस्ता अरुंद होणार आहे. यामुळे वाहतूक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी ते आकुर्डी बीआरटी मार्ग बंद होणार आहे.

याबाबत मेट्रोने पीएमपी व्यवस्थापनाला कळवले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यामुळे पुढील काही महिने बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.


पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौक या विस्तारित ४.५१ किलोमीटर एलिव्हेटेड मार्गिकेच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकात, आकुर्डीत खांब उभारणीचे काम सुरू झाले आहे. निगडीतील पवळे पूल येथील बीआरटी मार्ग खोदण्यात आला आहे. त्यामुळे निगडी ते आकुर्डी बीआरटी लेन बंद करण्यात आली आहे. मेट्रो पिलर टाकल्यानंतर रस्ता अरुंद होणार आहे. त्यामुळे बीआरटी मार्गिकाच बंद होण्याची शक्यता आहे.

पुणे महानगर महामंडळाच्या परिवहन (पीएमपीएमएल) बसमधून जलद प्रवास करता यावा, म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने बस रॅपिड ट्रान्झिट मार्ग (बीआरटी) बांधले आहेत. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात एकूण नऊ बीआरटी मार्ग आहेत. या सर्व मार्गावर ७२० बस चालविल्या जात आहेत. पुण्यातील बहुतांश बीआरटी मार्गाची दुरवस्था झाली आहे, तर काही बीआरटी मार्ग बंद झाले आहेत. परंतु पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच बीआरटी मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावरील निगडी ते आकुर्डीपर्यंतचा बीआरटी मार्ग बंद होण्याच्या वाटेवर आहे.

मार्ग कायम बंद होण्याच्या मार्गावर
चिंचवड स्टेशन पासून पुढे बीआरटी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मात्र, कामामुळे चिंचवड स्टेशन पासून पुढे बीआरटी थांबेदेखील काढावे लागणार आहेत. तर, काही थांब्यांची दुरावस्था होणार आहे. त्यामुळे हा मार्ग कायमचाच बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत पीएमपी प्रशासनाने असे होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले.