गावगाथाठळक बातम्या

Solapur: माजी आमदार नरसय्या आडम यांची संसदीय राजकारणातून निवृत्ती

सोलापूर (प्रतिनिधी): मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, कामगारांचे प्रश्न घेऊन मरेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढली जाईल. रस्त्यावरची लढाई लढतच मरण पत्करेन, असेही माजी आमदार नरसय्या आडम यांनी मंगळवारी (ता.२६) सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याबाबत माजी आमदार आडम म्हणाले, की निवडणुकीच्या राजकारणातून घेतलेला निवृत्तीचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अमलात आणला जाईल. पण सोलापूरमधील कामगार, कष्टकऱ्यांची चळवळ यापुढच्या काळात चालू ठेवण्यासाठी नवे नेतृत्व उभे करण्यात येईल.

 

आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात वारसदार नेमण्याची पद्धत नाही, हा काही संपत्ती वाटून घेण्याचा प्रकार नाही. जो चळवळीत पुढे जाईल, त्या माणसाला पक्षाचे नेतृत्व मिळेल. माझे वय आता ऐंशीपर्यंत आलेले आहे.

आता कुठेतरी थांबले पाहिजे, या विचारातूनच मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कामगारांची चळवळ मरेपर्यंत चालूच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुस्लिम करून कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाडण्यात आली, त्यामुळेच माझा पराभव झाला, हा माझा प्राथमिक निष्कर्ष आहे, असेही आडम यांनी म्हटले.

 

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर मध्य या मतदारसंघातून श्री. आडम यांनी निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. ते जवळपास चौथ्या क्रमांकावर गेले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button