Pune Crime: २०२० मध्ये पहिला गुन्हा दाखल ; चार वर्षांत गाठला गुन्ह्यांचा शतक ; सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
पुणे (प्रतिनिधी): शहर आणि परिसरात चोरी, घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ६१ हजारांचे दागिने, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीवर यापूर्वी तब्बल शंभरहून अधिक चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

महेश काशिनाथ चव्हाण (१९, रा. हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. विश्रांतवाडीतील धानोरी भागात नुकतीच घरफोडीची घटना घडली होती. येथून सोन्याचे दागिने चोरी गेले होते. या गुन्ह्यातील आरोपीचा तपास विश्रांतवाडी पोलिसांकडून सुरू होता. त्यादरम्यान गुन्ह्यातील आरोपी हा हडपसरमधील गंगानगर येथे असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना मिळाली.


त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. चव्हाण याने आपल्या साथीदारासह धानोरी भागात घरफोडी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ६१ हजारांचे दागिने आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. अटक आरोपी चव्हाण हा अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करत आहेत.


त्याच्यावर आजपर्यंत शंभरहून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर पहिला गुन्हा २०२० मध्ये दाखल झाला होता, तेव्हा तो पंधरा वर्षांचा होता. गुन्हे करताना तो दरवेळी वेगवेगळे साथीदार सोबत घेत असतो. सध्या तो एका गुन्ह्यात कारागृहात आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक नितीन राठोड, अंमलदार बबन वणवे, संदीप देवकाते, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.