Akkalkot: नाट्य कलाकार रूपाली भोसले यांनी घेतले अक्कलकोट स्वामींचे दर्शन

अक्कलकोट (प्रतिनिधी): मोठ्या व छोट्या पडद्यावरील पात्र हे निव्वळ रसिकांच्या मनोरंजनाकरिता चित्रीत होत असतात, परंतु जीवनाचे खरे रहस्य अध्यात्म व भावभक्तीतच दडले असल्याचे मनोगत छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाह मराठी वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मराठी नाटकातील संजनाची भूमिका साकारलेल्या रूपाली भोसले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी नाट्य कलाकार रूपाली भोसले यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बोलताना भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना रूपाली भोसले यांनी प्रत्येकाचे जीवन चढ-उतार सुखदुःख यांनी ओतप्रोत भरलेला आहे.

हाच सिद्धांत आम्ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सदर मालिकेस प्रेक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोनाने पाहून निव्वळ मनोरंजनाचा आनंद घ्यावा, कारण अशा छोट्या व मोठ्या पडद्यावरील बहुरंगी मालिका व चित्रपट निव्वळ मनोरंजनाचे स्त्रोत आहेत. हा जीवनाचा एक भाग आहे. जीवनात आध्यात्म भावभक्तीचा आधार घेऊन भाविक स्वामी समर्थांची भक्ती करीत असतात. अनेक भाविकांना मी स्वामींचे नामस्मरण करताना पाहिले आहे, त्यामुळे नकळत आज स्वामींच्या दर्शनाकरिता पाय अक्कलकोटकडे वळाली असून स्वामींचे दर्शन घेऊन धन्य झाले असल्याचे सांगितले.

तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समिती कडून भाविकांच्या प्रति स्वामी नामाचा प्रचार, प्रसार होत असलेले कार्य म्हणजे सकारात्मक प्रेरणा स्त्रोताचे द्योतक आहे. या अवलोकनातून मंदिर समितीचे कार्य हे राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यासारखे उत्तम मार्गदर्शक कार्य असल्याचे मनोगतही रूपाली भोसले यांनी व्यक्त करून स्वामींचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन सन्मान केल्याबद्दल मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे विशेष आभार मानले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, विपुल जाधव, कलाकार रूपाली भोसले यांच्या आई प्रज्ञा भोसले, वडील प्रकाश भोसले, भाऊ संकेत भोसले, सोलापूरचे मित्र राम माने, पाटील सर, संतोष जमगे, खाजप्पा झंपले आदीसह भाविक भक्त उपस्थित होते.
