गावगाथाठळक बातम्या

Indapur: चर्चा… गायीच्या डोहाळजेवणाची… ; इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत थाटामाटात झालं गाईचं डोहाळ जेवण

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील शेतकरी श्रीधर (बिट्टू) राऊत यांनी आपल्या चंद्रा गाईचे डोहाळ जेवण थाटामाटात केले. या अनोख्या डोहाळ जेवणासाठी गावासह पै पाहुण्यांनीही हजेरी लावली होती. थाटामाटात झालेले गाईचे डोहाळ जेवण निमगाव केतकी पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला.

 

म्हणतात ना हौसेला मोल नसते. मग कृषी संस्कृती जपणाऱ्या भारत देशात बळीराजा आपल्या परिवाराची नाही तर आपल्या शेतात उपयोगी येणाऱ्या सर्व घटकांची काळजी घेत असतो. भारत देशात गाईला अनन्य साधारण महत्व आहे. भारतात गाईला गोमाता म्हणूनही संबोधले जाते. त्याच गोमातेचा आदर म्हणून देशी खिल्लार गाईचे डोहाळे जेवण निमगाव केतकी येथील शेतकऱ्याने एखाद्या लग्नाला लाजवेल अशा पद्धतीने केले.

 

हजार लोकांच्या पगंती बसल्या. चंद्रा गाईला सुहासिनींकडून ओवाळण्यात आले. महिलांनी तिला पंच पक्वानांचा घास भरवत ओटीपूजन केले. या सर्व आठवणी कॅमेऱ्यात बंदीस्त करण्यात आल्या. देशी गाईबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाची परिसरात चांगलीच चर्चा आहे.

 

खिलार प्रजातीच्या गायींची संख्या वाढवण्यासाठी अनेक शेतकरी आणि गोप्रेमी प्रयत्न करीत आहेत. निमगाव केतकी येथील श्रीधर (बिट्टू) राऊत यांच्या घरात पूर्वापार देशी गाईंचे पालन केले जाते. त्यांनी गेल्या वर्षी एक नवीन गाय खरेदी केली. आनंदाने तिचे नाव चंद्रा ठेवले. आणि हिच चंद्रा राऊत कुटुंबियांच्या दारातील समृद्धीचे प्रतीक ठरली. गाईचे डोहाळ जेवण मोठ्या थाटामाटात करण्याचा निर्णय राऊत कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार डोहाळ जेवणाचे आयोजन केले होते.

 

डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमापुर्वी चंद्रा गाईला सजवण्यात आले. तिच्या अंगावर झूल टाकण्यात आली. तिची शिंगे रंगवली गेली. गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातले गेले. गळ्यात गुलाब पुष्पांचा हार घालण्यात आला. गाईसाठी स्वतंत्र मंडप घालण्यात आला. तसेच चंद्राच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाचे फलकही लावण्यात आले. चंद्रा गाईसाठी हिरव्या-सुक्या चाऱ्यासह खपरी, भूगी पेंड त्याचप्रमाणे फळे अनेक प्रकारच्या मिठाई पदार्थांनी डोहाळ जेवणाची रंगत वाढवली. देशी गाईबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला निमगाव केतकी परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली. या डोहाळे जेवणासाठी एक हजाराहून जास्त लोकांच्या पंगती उठल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button