गावगाथा

*मराठी तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे* *डॉ.येळेगावकर*

*मसापच्यावतीने मराठी दिनानिमित्त कवी संमेलन*

*मराठी तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे*
*डॉ.येळेगावकर*
—————–
*मसापच्यावतीने मराठी दिनानिमित्त कवी संमेलन*
——————————————


सोलापूर दि. २८ ( प्रतिनिधी ) जागतिकी- करणाच्या वेगवान स्पर्धेत मराठी भाषा टिकून राहण्यासाठी ती विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत प्रत्येकाने दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवला पाहिजे असे मत हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर, आणि शिवदारे महाविद्यालयाच्यावतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रा. भीमाशंकर शेटे होते.
प्रारंभी मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व आणि साहित्य परिषदेच्या उपक्रमाची माहिती दिली. ‘खुलुस’ आणि ‘झांबळ’ या पुस्तकाचे लेखक समीर गायकवाड यांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य दत्तात्रय सुत्रावे मसापच्या कार्याध्यक्षा सायली जोशी जेष्ठ कवी माधव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. येळेगावकर यांनी आपल्या भाषणात सोलापूरची साहित्य आणि कवी परंपरा सांगीतली. कविराय राम जोशी, संजीव, रा ना पवार, शरणकुमार लिंबाळे यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी ही परंपरा समजून घेऊन कवी आणि साहित्यिक होण्यासाठी वाचन, चिंतन, सूक्ष्म, सामाजिक निरीक्षण, शब्दांची आराधना करायला हवी असेही ते म्हणाले.
लेखक समीर गायकवाड यांनी युवकांनी वाचन वाढवण्याचा सल्ला दिला. भवतालाचे जीवन डोळसपणे अनुभवले पाहिजे आणि सोशल मीडियाचा वापर सावधपणे करणे अनिवार्य आहे असेही सांगितले.
ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन झाले. यामध्ये डॉ.विद्या देशपांडे, गिरीश दुनाखे, डॉ. क्षमा वळसंगकर, रामचंद्र धर्मसाले, प्रांजली मोहीकर, डॉ. दामोदर बनसोडे, महेश गिरीगोसावी, समर्थ दिंडोरे यांनी सहभागी होऊन कविता सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभदा उपासे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. दत्तात्रय सुत्रावे यांनी मांनले याप्रसंगी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर. वाय. पाटील, तंत्रज्ञ- नागिनी नागशेट्टी, मसापचे उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, कोषाध्यक्ष आनंद देशपांडे, मसापचे कार्यकारणी सदस्य प्रशांत जोशी, रोहिणी कुलकर्णी, ना.वा. दुमालदार यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
—————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button