मराठा आरक्षण न मिळाल्यास मोदींचे विमान सोलापुरात उतरू देणार नाही
पुरुषोत्तम बरडे : चौत्रा पुणे नाका तरुण मंडळ आणि शिवप्रभू प्रतिष्ठानचा साखळी उपोषणाला पाठिंबा

मराठा आरक्षण न मिळाल्यास मोदींचे विमान सोलापुरात उतरू देणार नाही

पुरुषोत्तम बरडे : चौत्रा पुणे नाका तरुण मंडळ आणि शिवप्रभू प्रतिष्ठानचा साखळी उपोषणाला पाठिंबा

मराठा आरक्षण न मिळाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान सोलापुरात उतरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे (ठाकरे गट) सोलापूर लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिला. पुनम गेट येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास गुरुवारी शिवप्रभू प्रतिष्ठान आणि चौत्रा पुणे नाका तरुण मंडळाने मोठ्या रॅलीद्वारे पाठिंबा दिला.

जुना पुणे नाका येथील चौकातून रॅलीस प्रारंभ झाला. प्रारंभी धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात आले. यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन झाले. युवकांचा सहभाग असलेली बाईक रॅली तसेच शेकडो रिक्षांमधून महिला भगिनींनी रॅलीद्वारे जाऊन पुनम गेट येथील साखळी उपोषणास प्रचंड मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला.

यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) सोलापूर लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले, मराठा आरक्षणावर सकारात्मक निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्यावे. गुणवत्ता असून देखील मराठा समाज शिक्षण, नोकरी या क्षेत्रांमध्ये मागास राहिला आहे. त्यामुळे या मागास समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. अन्यथा मराठा समाज पेटून उठल्यास राज्य आणि केंद्र सरकारला पळता भुई थोडी होईल.

यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) सोलापूर लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, लहू गायकवाड, रिक्षा सेनेचे सुरेश जगताप, आशुतोष बरडे, युवक संघटक समर्थ बरडे, दत्तात्रय देशमुख, अकील सय्यद, संजय साळुंखे, सुरेश शेवतेकर, तुषार अवताडे, संजय खटके, मुख्याध्यापक शंकर वडणे, गंगुबाई शेवतेकर, वंदना माने, सलिमा सय्यद, दैवशाला मोरे, नागरबाई टणके, अनिता शेवतेकर, बसव्वा टणके, सुनिता माने, सोनाबाई आदींसह मोठ्या संख्येने शिवप्रभू प्रतिष्ठान व चौत्रा पुणे नाका मंडळाचे पदाधिकारी सदस्य आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.