गावगाथा

गुरुवार-शुक्रवारी वागदरीत श्री परमेश्वर आराधना (पर्व) पालखी महोत्सवाचा जागर

भव्य पालखी मिरवणूक, अखंड अन्नदान, भक्तिगीत, भारूड व पारंपरिक कलाविष्कारांचे आयोजन

गुरुवार-शुक्रवारी वागदरीत श्री परमेश्वर आराधना (पर्व) पालखी महोत्सवाचा जागर
भव्य पालखी मिरवणूक, अखंड अन्नदान, भक्तिगीत, भारूड व पारंपरिक कलाविष्कारांचे आयोजन
वागदरी, ता. अक्कलकोट : प्रतिनिधी
वागदरी (ता. अक्कलकोट) येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यांच्या आराधना (पर्व) पालखी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, बुधवार दि. १६ सप्टेंबरपासून शुक्रवार दि. १८ सप्टेंबरपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत होणाऱ्या भव्य पालखी मिरवणुकीसाठी पंचक्रोशीतील भाविकांसह परगावाहून येणाऱ्या विविध कलापथकांची उपस्थिती राहणार आहे.
सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री परमेश्वर आराधना पर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहे. बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.२४ ते रात्री ९.४६ या वेळेत कंटली पूजनाचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.१५ ते सकाळी ८.३० या वेळेत श्रींचा महारुद्राभिषेक होणार आहे. हा धार्मिक विधी श्री. म.नि.प्र. शिवलिंगेश्वर महास्वामीजी, विरक्त मठ वागदरी यांच्या अमृतहस्ते, तसेच श्री ष.ब्र. वीरमहांत शिवाचार्य, महांतेश्वर मठ, चिन्मयगिरी चौडापूर, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी यांच्या दिव्य सान्निध्यात संपन्न होणार आहे.
यानंतर सकाळी १०.३० ते दुपारी १.१५ या वेळेत भव्य अंबील घागर मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसाद, श्रींचे दर्शन व आशीर्वचनाचा कार्यक्रम होईल. दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत भक्तिगीतांचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री ९ वाजता परगावाहून विविध संघांचे आगमन होणार असून, भव्य भारूड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता श्री बिरलिंगेश्वर डोळ्लीन गायन संघ, निलूर, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी यांचा गायन कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मुख्य गायिका अंबिका निलूर, मास्तर उमेश व मास्तर गब्युरवाडी यांचा सहभाग राहणार आहे. तसेच श्री अमोगसिद्धेश्वर गायन संघ, गुणकी, जि. विजयपूर यांचा कार्यक्रम होणार असून मुख्य गायक अभिषेक गुणकी, मास्तर सुरेश व मास्तर गुणकी सहभागी होणार आहेत. रात्री ११ वाजता गोंधळी नाटकाचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवारी भव्य पालखी मिरवणूक
शुक्रवार दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते १.१५ या वेळेत म.नि.प्र. श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, श्री हुच्चेश्वर विरक्त मठ, निंबर्गा, ता. आळंद, जि. कलबुर्गी यांच्या शुभहस्ते श्रींची पालखी पूजा होणार आहे. त्यानंतर श्री परमेश्वर मंदिरापासून श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या मिरवणुकीत गावातील तसेच परगावाहून येणारे लेझीम, टिपरी, डफली, ढोल, झांज पथक, मल्लखांब, भजन मंडळ, नंदीध्वज, नगारावाद्य, बहुरूपी व भारूड पथक सहभागी होणार आहेत. पारंपरिक वाद्ये, लोककला आणि भक्तिमय वातावरणामुळे पालखी मिरवणुकीला विशेष रंगत येणार आहे.
शुक्रवार दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३९ वाजता पालखीला सुहासिनींची महाआरती होणार आहे.
दोन दिवस अखंड अन्नदान
श्री परमेश्वर आराधना पर्वानिमित्त दोन दिवस अखंड अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अन्नदान सेवेसाठी स्वेच्छेने देणगी देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी पंचकमिटीशी संपर्क साधावा, असे आवाहन पंचकमिटीचे प्रमुख राजकुमार निंबाळे यांनी केले आहे.
श्री परमेश्वर आराधना पर्वाच्या निमित्ताने वागदरी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री परमेश्वरांचे दर्शन, पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button