गावगाथाठळक बातम्या

Solapur : धक्कादायक ..! राज्यात ‘गिया बार्रे’ (जीबीएस) चा पहिला बळी…. तेही सोलापूरात

सोलापूर (प्रतिनिधी): राज्यामध्ये दुर्मिळ गिया बार्रे सिंड्रोममुळे (जीबीएस) पहिला मृत्यू झाला आहे. पुण्यातून सोलापुरात दाखल झालेल्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यातील जीबीएसची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेने केले आहे. जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात असून त्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या रुग्णाबरोबर नक्की घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, मरण पावलेला रुग्ण 40 वर्षांचा होता. त्याला पुण्यात असतानाच जीबीएसची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाला होता. 18 जानेवारी रोजी सर्दी, खोकला आणि श्वसनास त्रास होत असल्याने या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला या रुग्णाला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्याला साध्या रुममध्ये हलवण्यात आलेलं. मात्र अचानक शनिवारी (25 जानेवारी रोजी) त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.

जीबीएसची लागण झाल्याचं समजल्यानंतर…

 

मृत व्यक्तीला पुण्यात जीबीएसची लागण झाली होती अशी माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच या रुग्णाचा व्हीसेरा देखील पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या रुग्णाचा मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतीत प्राथमिक माहिती ही शवविच्छेदन आणि व्हीसेरा तपासणी अहवाला नंतरच प्राप्त होईल. मात्र जीबीएसबाबतीत कोणीही अफवा पसरवू नये, तसेच लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सोलापूर पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

पुण्यात सर्वाधिक रुग्ण; विशेष उपाय योजना

पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात गिया बर्रे सिंड्रोमवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी रुग्णालयामध्ये 50 बेड आरक्षित करण्यात आले असून 15 आयसीयू बेडही कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. जीबीएस गिया बर्रेचे पुण्यात 74 रुग्ण आहेत. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण 5 रुग्णांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे अशी माहिती, पुणे पालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. ज्या खाजगी रुग्णालयात जीबीएसचे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ रुग्णालय या ठिकाणी खाजगी दवाखाने रुग्णांची बिल किती घेतात यावर हे अधिकारी नजर ठेवणार आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे, असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं. 

‘जीबीएस’ची लक्षणं काय?

गिया बार्रे सिंड्रोम हा एक हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. जाणून घ्या या आजाराची लक्षणं काय… 

 

– शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

– स्नायु कमकुवत होतात.

– हात, पायात मुंग्या येतात.

– अशक्तपणा जाणवू लागतो.

– बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणं.

– धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणं.

 

यातील कोणतीही लक्षण जाणवल्यास लगेचचं जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button