काय सांगतोयस मर्दा..? व्हंय.! कोल्हापुरी चपलेला येणार सोन्याचे दिवस…
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
विशेष प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी चप्पलला २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामुळे मोठा बूस्टर मिळण्याची शक्यता आहे कारण या अर्थसंकल्पात चामड्यापासून पादत्राणे बनविणार्यांसाठी विशेष योजना लागू केली जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात चामड्याची पादत्राणे बनवणार्यांसाठी विशेष योजना आणण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या योजनेमुळे कोल्हापूरच्या चर्मोद्योगला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरमध्ये चप्पल व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. पिढ्यानपिढ्या या व्यवसायाचा वारसा जपला गेला असून, आजही या चप्पलांचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने केले जाते. उच्च दर्जाचे चामडे, सुबक डिझाइन आणि मजबूत बांधणी यामुळे कोल्हापुरी चप्पल ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, सध्याच्या पिढीतील तरुण या व्यवसायात फारसे स्वारस्य दाखवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
सरकारच्या नव्या योजनेमुळे कोल्हापूरच्या चप्पल व्यवसायाला आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळेल. विशेषत: लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, तसेच नवोदित उद्योजकांना व्यवसायात स्थिरता मिळण्यास मदत होईल. पारंपरिक चर्मोद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठीही सरकार विशेष प्रयत्न करीत आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
कोल्हापूरमध्ये जवळपास ३,५०० कुटुंबे आणि जिल्ह्यात २०,००० हून अधिक कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे ही योजना स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारी ठरणार आहे. नवीन गुंतवणूकीसह रोजगारनिर्मितीला गती मिळेल. सरकारच्या अंदाजानुसार, चामड्याच्या आणि इतर प्रकारच्या पादत्राणे क्षेत्रातून २२ लाख रोजगार निर्माण होऊ शकतात, तर या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल चार लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
महिला कारागिरांना विशेष प्रशिक्षण देण्यावरही सरकारचा भर आहे. मागील काही वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून जिल्ह्यातील ३० महिला कारागिरांना कोल्हापुरी चपलांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये चामड्याचे कटिंग, विणकाम, रंगकाम, शिवणकाम आणि डिझाइनिंग यासारख्या प्रक्रियांवर भर दिला जात आहे. महिलांनी बनवलेल्या कोल्हापुरी चप्पलांना नव्या योजनेअंतर्गत बाजारपेठ मिळावी, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.
ग्रामविकास मंत्रालय आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या सहकार्यात कोल्हापुरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. लघु उद्योगांना मदत मिळावी आणि स्थानिक उत्पादनाचा प्रचार होण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. चप्पल उद्योगात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्याचा सरकारचा उद्देश असून, त्यासाठी आर्थिक मदतीसह प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडे, चिंचवड, गडमुडशिंगी, गांधीनगर, नेर्ली, तामगाव, कणेरीवाडी, शिंगणापूर, पाचगाव या गावांमधील ३० महिला सध्या प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना हस्तकला केंद्राकडून दिवसाला ३०० रुपयांचा भत्ता दिला जात आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक सक्षमता मिळण्यास मदत होत आहे.
महिला उद्योजकांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. कोल्हापुरी चप्पलांचा पारंपरिक वारसा जपण्याबरोबरच, त्यात नव्याने काही प्रयोग केले जात आहेत. हस्तकलेच्या विविध शैलींचा वापर करून या चप्पलांचे आकर्षण वाढवले जात आहे. त्यामुळे पारंपरिक कोल्हापुरी चप्पलांचा ‘स्वॅग’ नव्या पिढीला भुरळ घालणार आहे.
सरकारच्या नव्या योजनेमुळे कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला नवी गतीमान दिशा प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पारंपरिक कारागिरांना नव्या युगातील तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास जागतिक स्तरावर या चपलांना मोठी बाजारपेठ मिळू शकते. त्यामुळे येत्या काळात कोल्हापुरी चप्पल उद्योगाला सोन्याचे दिवस येणार, हे निश्चित!