वळसंग येथे शिवजयंती उत्साहात साजरी; ‘शिवरायांच्या उंचीचा राजा अजून जन्माला यायचा आहे’ — पत्रकार अल्ताफ पटेल
वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) : प्रतिनिधी
बहुजन प्रतिपालक तथा रयतेचा राजा म्हणून ख्याती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे पटेल प्रतिष्ठानच्या वतीने सलग १५ व्या वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वळसंग पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना पटेल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार अल्ताफ पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही जाती-धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. “शिवरायांच्या विचारांची आणि कार्याची उंची इतकी महान आहे की त्यांच्या उंचीचा राजा अजून जन्माला यायचा आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
वळसंग पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी पटेल प्रतिष्ठानच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत शिवजयंतीसारखे कार्यक्रम समाजात एकात्मता निर्माण करतात, असे मत व्यक्त केले.
वळसंगचे माजी सरपंच प्रा. महादेव होटकर यांनी सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी सामूहिक शिवजयंती साजरी होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शिवरायांच्या विचारांतून समाजाला दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात कुमारी श्रीमयी कलशेट्टी या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षमय जीवनावर प्रभावी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य बलवान गोतसुर्वे, माजी पंचायत समिती सदस्य सोनुताई कलशेट्टी, वळसंग गावचे आजी-माजी सरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध शिवजन्मोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच पटेल प्रतिष्ठानचे पदाधिकारी, शिवप्रेमी आणि विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!