अक्कलकोट तूप चौक येथे शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक पाणपोईचा शुभारंभ
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर तूप चौक, जुना आडत बाजार रोड येथे सार्वजनिक पाणपोईचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. मातोश्री अनुसया महिला बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संचलित, भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला विद्यमान नगरसेवक महेश हिंडोळे, समाजसेवक उत्तम इंगळे, दयानंद बिडवे, भारतीय लहुजी सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल झपले, सद्दाम शेख, समर्थ देडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजसेवक वसंत देडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अठरा वर्षांपासून अविरतपणे पाणपोई सुरू ठेवण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी, कामगार, व्यापारी तसेच नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली. समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या सेवेसाठी पुढे येणे हीच खरी शिवभक्ती असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
अठराव्या वर्षीही पाणपोई सुरू ठेवण्यात मिळालेले यश हे स्वामींची पुण्याई व कृपाशीर्वाद असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिवजयंतीच्या पावन दिनी सुरू झालेल्या या पाणपोईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!