*वाबळेवाडी शाळेत सलग पाच तास अखंड वाचन*
- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

*वाबळेवाडी शाळेत सलग पाच तास अखंड वाचन*
– मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
ता. 29 ( पुणे प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यातील उपक्रमशील जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त शाळेत सलग पाच तास अखंड वाचन हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात एकूण 540 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. येथील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे सलग पाच तास अखंड वाचन घेण्यात आले. युवा साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावरील लॉनवर बैठक मारत वाचनाचा आनंद घेतला. अवांतर वाचण्याची वेगवेगळी पुस्तके यावेळी विद्यार्थ्यांनी वाचली. यात थोर महापुरुषांच्या जीवनावरील चरित्र, विज्ञान कथा, पंचतंत्र, इसापनीतीच्या गोष्टी यांसारख्या पुस्तकांचा त्यांनी यावेळी आनंद घेतला.
विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचनही करावे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. वाचन हीच यशस्वी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे. इतिहासातील थोर महापुरुषांनी वाचनातूनच आपले जीवन घडवले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दररोज दोन ते तीन तास अवांतर वाचन करावे, असे मत साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच वाचनासंबंधी असे वेगवेगळे उपक्रम शाळेत दर महिन्याला घ्यावेत असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका शरीफा तांबोळी यांनी व्यक्त केले.
