फोक आख्यानच्या दमदार सादरीकरणाने अक्कलकोटकर मंत्रमुग्ध; श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात पाचवे पुष्प संपन्न

अक्कलकोट (प्रतिनिधी) :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त गुरुवार, दि. २३ जुलै रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या “फोक आख्यान” या लोकसंगीत आणि लोककथनाच्या कार्यक्रमाने अक्कलकोटकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, शाहिरी बाणा, लोककलेचा प्रभावी आविष्कार आणि आधुनिक सादरीकरणाची सांगड घालत कलाकारांनी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविस्मरणीय अनुभव रसिकांना दिला.

न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महोत्सवातील हे पाचवे पुष्प ठरले. संतचरित्रे, पौराणिक कथा, शूरवीरांच्या गाथा, भक्तीपर आख्याने, घरंदाज लावणी, जात्यावरच्या ओव्या आणि लोकपरंपरेतील विविध कलाविष्कारांनी उपस्थितांना भारावून टाकले.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल, आयुक्त सचिन ओंबासे, प.पू. धनंजय पुजारी, नगरसेवक अमोल शिंदे, चंद्रशेखर रेड्डी, ओंकार पवार, नगरसेविका संगीताताई जाधव, सी.ए. धनराज नोगजा, मानस झा, गिरीष कणेकर, योगेश अहंकारी, राजेंद्र लिंबीतोटे, नितीन चव्हाण, निहार आडकर, समीर लोंढे, डॉ. विनायक बुदले आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, नटराज आणि स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी आणि विश्वंभर पुजारी यांच्या मंत्रोच्चारात पूजन विधी पार पडला.
यावेळी न्यासाच्या वतीने सतीश पवार, राजू पवार (पानमंगरूळ), मोहित आंटद (अक्कलकोट) आणि प्रेम नोगजा (सोलापूर) यांना ‘गुणीजन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सहा गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान न्यासाच्या नियोजित ६० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक महाप्रसादगृह प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. सुमारे १ लाख १९ हजार ३९८ चौरस फूट क्षेत्रफळाच्या या भव्य वातानुकूलित इमारतीत २,५०० भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था, ५,००० भाविकांसाठी प्रतीक्षाकक्ष, आधुनिक स्वयंपाकगृह, धान्य व भाजीपाला कोठार, चपाती बनविण्याच्या सात स्वयंचलित मशिन्स, डिशवॉशर आणि अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर ५१ फूट उंच श्री स्वामी समर्थांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार असून हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली.
महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शुभेच्छा संदेश पाठवून अन्नछत्र मंडळाच्या समाजसेवेचे, अन्नदान, शिक्षण, आरोग्य व अध्यात्म क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.
या वेळी विश्वस्त, पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी, भाविक आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले, तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी स्वागत व आभार मानले. उत्कृष्ट प्रकाशयोजनेची जबाबदारी शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी सांभाळली.
चौकट : आजचा कार्यक्रम
शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी सायंकाळी ७.१५ ते ९.३० या वेळेत राष्ट्रीय कीर्तनकार व समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), संगमनेर यांचे प्रेरणादायी कीर्तन आयोजित करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!