गावगाथाठळक बातम्या

Engineers: इंजिनिअरिंग मध्ये नापास झालात..? चिता नको,.. तरीही मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश ; जाणून घ्या सविस्तर..

पुणे (प्रतिनिधी): इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुढील वर्गात जाण्यास अडचण येते, त्यांच्यासाठी आता एक मोठा दिलासा मिळाला आहे.

दहावीच्या परीक्षेमध्ये जसा ATKT चा पर्याय उपलब्ध करून दिला जातो, तसाच प्रकार आता अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश घेता येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

 

या नव्या निर्णयानुसार, प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रासाठी, तर द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्रात प्रवेश घेता येईल. म्हणजेच, तीन किंवा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील या निर्णयाचा फायदा होईल. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार आहे.

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांसह लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची पुढील वर्गात प्रवेश घेण्याची पात्रता आता २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील सम सत्राच्या परीक्षांऐवजी २०२४-२५ या वर्षातील विषम सत्राच्या निकालाच्या आधारे ठरवण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त संधी मिळेल आणि त्यांचे शिक्षण थांबण्याची शक्यता कमी होईल. विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी महत्त्वाची अटही घालण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विषम सत्राच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी स्वतः घ्यावी लागणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडे आवश्यक हमीपत्र भरून देणे बंधनकारक असेल. या सत्राचे परीक्षांचे आयोजन सम सत्राच्या परीक्षांसोबत एकत्रितपणे करण्यात येणार आहे.

हा निर्णय लागू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अपूर्ण अभ्यासक्रमाची पूर्तता करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे शिक्षण पूर्ण करण्याचा मार्ग सुकर होईल आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अडचणींवर मात करण्याचा मार्ग मिळेल. शिक्षण क्षेत्रातील हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्याला अधिक उंचावण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून त्यांच्या करिअरच्या संधी वाढवण्यास सहाय्यक ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button