गावगाथाठळक बातम्या

Solapur : कौतुकास्पद…! सख्ख्या बहिणींनी रोवला एमपीएससीत यशाचा झेंडा…. गॅरेज चालकाच्या मुलींची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी…

HTML img Tag Simply Easy Learning    

 सोलापूर (प्रतिनिधी ): घरचे अठराविश्व दारिद्र्य, आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडीलाचा गॅरेजचा तोडका- मोडका व्यवसाय, सहा माणसांचं कुटुंब चालविण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड, जिथे घर चालवण्याची चिंता तिथे मुला-मुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा. परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेला दृढनिश्चय कामाला आला आणि कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील गलिच्छ वस्ती सुधारणा मधील आठ पत्र्याच्या घरातील गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला. संजीवनी आणि सरोजिनी अशी त्या दोन सख्ख्या बहिणी आणि पक्क्या मैत्रिणींची नावे असून ज्योतीराम भोजने हे पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या गॅरेज चालक वडीलाचे आणि गृहिणी असलेल्या आईचे रेश्मा नाव आहे.तर भाऊ श्रीनिवास याने खंबीर साथ दिल्याने यशाला गवसणी घातल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

  ज्योतीराम भोजने हे गवळी वस्ती मधील कामगार वस्ती भागात राहतात. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत ओरोनोको प्राथमिक शाळेत झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही. परंतु त्यांनी मेकॅनिकल क्षेत्रामध्ये जम बसवला. ज्योतीराम यांना संजीवनी आणि सरोजिनी या दोन मुली आणि श्रीनिवास हा एक मुलगा आहे .ज्योतीराम ज्या घरात राहतात ते घर आठ पत्र्याचे असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले आयुष्य काढले आहे. ज्योतीराम यांना आपल्या वडिलांच्या आजारपणातच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या खचून गेले होते. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा तर विचार न केलेलाच बरा असाच प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. परंतु दोन्ही मुलींनी बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले .मोठी संजीवनी आणि छोटी सरोजिनी हिने बी कॉम नंतर २०१८ पासून एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याला सुरुवात केली. सात वर्षाच्या कालावधीत तीन वर्षे कोरोनाने अत्यंत हलाखीची परिस्थिती आणली. या काळात परीक्षाच होऊ न शकल्यामुळे त्या दोघी खचून गेल्या. परंतु आपण खचलो आहोत हे त्यांनी आई-वडिलांना दाखवून दिले नाही. संजीवनी आणि सरोजिनी ह्या दोघी सख्ख्या बहिणी असल्या तरी त्या पक्क्या मैत्रिणी झाल्या होत्या. आणि त्या दोघींनी सुद्धा एमपीएससी मध्ये यश मिळवायचेच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीला सामोरे जात अखेर यशाचा झेंडा रोवलाच. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला. संजीवनी आणि सरोजिनी या दोघींनी सुद्धा सात वर्षात एकूण सहा एमपीएससीच्या मेन्स परीक्षा दिल्या. परंतु या सर्व वेळी त्यांना पॉईंटमुळे मागे पडावे लागत होते. मात्र जिद्द सोडली नाही. अखेर स्वामी समर्थांच्या भक्त असलेल्या संजीवनी आणि सरोजिनी यांना बुधवारच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्रीच गोड बातमी मिळाली. आई-वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कामगार वस्तीत अठरा विश्व दारिद्र्य आणि गँरेजच्या आलेल्या पैशातून दोन्ही मुलींना शिकविण्या आनंद आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. सख्खा भाऊ पाठीशी असल्यानंतर बहिणी यशात मागे कशी पडूच शकत नाहीत, याची अनुभूती या निमित्ताने दिसून आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

———————————–

HTML img Tag Simply Easy Learning    

 सामाजिक कार्यात रस…

 आई-वडिलांचे प्रयत्न आणि सख्या भावाची जिद्द असल्यामुळेच आज आम्ही दोघींनी एमपीएससी मध्ये यशाचा झेंडा रोवला आहे. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा केवळ आणि केवळ सामाजिक कार्य करण्याच्या अनुषंगाने आणि आई वडिल व भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून व अभ्यास करून परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे. याचा मनोमन आनंद वाटतो. तीन वेळा पीएसआय ची परीक्षा दिली. एक वेळा सेल्स टॅक्स तर एकदा टॅक्स असिस्टंट पदासाठी परीक्षा दिली. मात्र पॉईंट मध्येच माघार पडले. परंतु अपयश पदरी येऊन सुद्धा खचलो नाही. आणि अखेर मंगळवारी आनंदाचा दिवस उजाडला .एमपीएससी उत्तीर्ण झाले असून मंत्रालय महसूल विभागात क्लार्क म्हणून आपणास पोस्ट मिळणार आहे. मोठ्या पदापर्यंत पोहोचलो तरी गरिबी विसरणार नसल्याचे संजीवनी ज्योतीराम भोजने हिने सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

———————————–

  डोक्यात फक्त आणि फक्त यशच …..

 सख्ख्या बहिणी असलो तरी आम्ही पक्य्या मैत्रिणी होतो. घरची परिस्थिती जाणून होतो. दररोजच घरचे अठरा विश्वदारिद्र्य डोळ्यासमोर दिसत होते. आठ पत्रे असलेल्या घरात आई ,वडील, तीन भावंड आणि आजी असे एकूण सहा जण कसेबसे दिवस काढायचो. यातून अभ्यासाला बसताना पाय सुद्धा पसरता येत नव्हते, अशी परिस्थिती होती .परंतु आई-वडील आणि भावाची आम्हा दोघींना शिकवण्याची जिद्द होती. त्याच जिद्दीला आम्ही सुद्धा साथ दिली आणि कोणत्याही परिस्थितीत एमपीएससी मध्ये यश मिळवायचंच अशी मनाची खूनगाठ बांधली. आणि यशाला गवसनी घातली. आपण महसूल सहाय्यक आणि कर सहाय्यक अशा दोन्ही पदासाठी पात्र असलो तरी कर सहाय्यक म्हणून काम करण्याची आपली इच्छा आहे. त्यामध्येच आपण आपले करिअर घडवत सामाजिक कार्यात वाहून घेणार असल्याचे सरोजिनी ज्योतिराम भोजने हिने सांगितले.

 खचलो होतो थांबायचं सुद्धा ठरवलं होतं …. पण….

 घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत होती. गॅरेज मधून आलेल्या थोड्या पैशामधूनच घर चालवायचं आणि त्यातूनच शिक्षणासाठी लागणारी पुस्तक खरेदी करून द्यायची. कोरोना काळात पूर्ण खचून गेलो होतो आणि आता मुलींचे शिक्षण थांबवावे असा निर्णय मनोमन घेतला होता. परंतु मुलींच्या जिद्दीपुढे मला सुद्धा काही करता आले नाही. आणि अनेकांनी मदतीचा हात दिला. आणि आज सोनेरी दिवस उजाडला ,अशी प्रतिक्रिया संजीवनी आणि सरोजिनी यांचे वडील ज्योतीराम भोजने यांनी दिली.

  यांची झाली मदत ….

एमपीएससीचा अभ्यास करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे सरोजिनी आणि संजीवनी सांगतात. ज्या – ज्या वेळी पुण्याला परीक्षेला जावे लागत होते, त्यावेळी आवसे वस्ती आमराई परिसरात असलेले आणि शेती करत असलेले मावस भाऊ प्रशांत शिवाजी बचुटे यांनी आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधारसुद्धा दिला. त्यामुळेच परीक्षा भयमुक्त वातावरणात देता आली. तर कोरोना काळात घरात जागा कमी पडू लागल्यामुळे वडिलांचे मित्र ब्रह्मदेव खटके यांनी गडदर्शन सोसायटीमधील त्यांच्या घराच्या खोल्या वर्षभरासाठी एकही रुपयाचे भाडे न घेता अभ्यासासाठी मोफत दिल्या. आई रेश्मा आणि आजी तारामती यांनी या कालावधीत सकाळ आणि सायंकाळ आशा दोन सत्रात चहा, नाष्टा आणि जेवण खोलीपर्यंत आणून दिले. त्यांचे उपकार आपण कधीच विसरणार नसल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button