*येत्या १५ व १६ मार्च रोजी नांदेड येथे आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन !*
साहित्य संमेलन २०२५

-
*येत्या १५ व १६ मार्च रोजी नांदेड येथे आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन !*
नांदेड (प्रतिनिधी) : येत्या शनिवार दि. १५ मार्च व रविवार दि. १६ मार्च २०२५ रोजी नांदेड येथे चौथ्यांदा दोन दिवशीय आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्धार गुरु रविदास जयंती महोत्सवातून जाहिर करण्यात आला.
तारखेनुसार वीर कक्कया, गुरु रविदास आणि संत सेवालाल महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव १५ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने पृथ्वी लाॅन्स मंगल कार्यालय, बालाजीनगर नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन पुनःश्च चौथ्यांदा नांदेड येथे आयोजित करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला.
नांदेड येथे चौथ्यांदा आयोजित करण्यात येत असलेल्या आठव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनास यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असा एकमुखी निर्धार समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केला. हे संमेलन पुन्हा नांदेडमध्ये दोन दिवसांचे होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.
अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे मुख्य प्रवर्तक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले. आतापर्यंतच्या विविध ठिकाणी संपन्न झालेल्या सात साहित्य संमेलनाचा आढावा तसेच आठव्या साहित्य संमेलनाची सविस्तर रुपरेषा त्यांनी यावेळी सादर केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव शेळके, हिरामण गंधारे, दत्तात्रय भालके, नामदेव फुलपगार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
बैठकीस उपस्थित भीमराव वाघमारे, गंगाधर गंगासागरे, संतोष सुर्यवंशी, सुरेश वाघमारे, प्रा. नागनाथ गिरगावकर, कुसुम गायकवाड, अनिता देगलूरकर, मीनाक्षीताई वाघमारे, इंदूताई भालके, कमलताई देशमाने यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना निमंत्रित न करता हे संमेलन अराजकीय असावे असे मत बहुतेकांनी यावेळी मांडले. मंगलताई दुधंबे यांच्या आभार प्रदर्शनाने या बैठकीची सांगता झाली.
साहित्य संमेलन व कांशीरामजी यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त निबंध, वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची निवड लवकरच आयोजित करावयाच्या पुढील व्यापक बैठकीत करण्यात येणार आहे तसेच संयोजन समितीच्या वतीने प्रचार प्रसारासाठी व निधी संकलनासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करण्यात येणार आहे.
या दोन दिवशीय साहित्य संमेलनात विविध महामानवांच्या नावाने सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता, गायन, क्रीडा, कृषी, व्यापार, उद्योग, प्रशासन ई. क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठीचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी ८५५४९९५३२० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.