Education: इयत्ता पहिली चा वर्ग १ एप्रिल पासूनच सुरु होणार.? काय आहे शासनाचा नवा फंडा, जाणून घ्या…
दयानंद गौडगांव
सोलापूर (प्रतिनिधी): शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण ७६ दिवस सार्वजनिक सुट्या असतात. याशिवाय दर आठवड्यातील रविवारी (एकूण ५२ रविवार) देखील शाळांना सुटी असते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर विद्यार्थी शाळेला येतच नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे वर्षातील ३६५ दिवसांपैकी २२० दिवस देखील विद्यार्थ्यांचे अध्यापन होत नाही. या पार्श्वभूमीवर आता सुरवातीला २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ एप्रिलपासून भरविले जाणार आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा अंगणवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे. ‘बालभारती’कडून सध्या युद्धपातळीवर पुस्तकांची छपाई सुरू आहे. ‘सीबीएसई’च्या शाळा आता १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याच धर्तीवर आगामी काळात राज्यातील सर्वच शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात त्याचवेळी होणार आहे.

तत्पूर्वी, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ एप्रिलपासून भरविण्यात येणार असून, त्यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयारी सुरू केली आहे; जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील २२० दिवस अध्यापन करणे शक्य होणार आहे. शाळा एप्रिलपासून सुरू झाली, तरी १ मेनंतर निश्चित काळातील उन्हाळा सुटी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. १० ते १५ जूनपासून पुन्हा शाळा सुरू होतील, असा बदल असणार आहे.

