Nagpur Violence: नागपूर हिंसाचार पूर्वनियोजितच..! कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा… म्हणाले , छावा सिनेमामुळे…

मुंबई (प्रतिनिधी): औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी रात्री आठच्या सुमारास दोन गटांत राडा झाला. महाल, गांधी गेट, चिटणीस पार्क, भालदारपूरा परिसरात सोमवारी सायंकाळपासून उसळलेल्या दोन गटातील दगडफेक, हिंसाचारात तीन पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह ३५ जण जखमी झाले.

यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यानंतर आज मंगळवारी कलम १६३ अंतर्गत अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. “ही हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडले जाणार नाही.” असे फडणवीस यांनी सांगितले.

काल सकाळी ११.३० वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी कबर हटाव यासाठी आंदोलन केले. जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली; त्यात एक धार्मिक मेसेज लिहिलाय अशी अफवा पसरवली. ८० लोकांचा जमाव होता. त्यांनी दगडफेक केली. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये पूर्वनियोजित पॅटर्न दिसतोय, असे फडणवीस यांनी म्हटले.


छावा चित्रपटामुळे औरंगजेब विरुद्ध रोष पेटला
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची गरज आहे. मी कायदा आणि सुव्यस्था राखण्याचे आवाहन करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “छावा चित्रपटामुळे औरंगजेब विरुद्ध लोकांचा रोष वाढला आहे. तरीही सर्वांनी महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे.” असे फडणवीस यांनी सांगितले.