Akkalkot: खेडगी परिवाराच्या वतीने श्रीशैलम येथे साधू-संताना अन्न व वस्त्रदान सेवा ; ६१ वर्षांची परंपरा कायम

अक्कलकोट, दि.२९- दानशूर तथा शिक्षण महर्षी स्व. चनबसप्पा खेडगी व स्व. शिवशरण खेडगी यांची सुमारे ६१ वर्षाची समाजाचे ऋण फेडण्याच्या कार्याची परंपरा अखंडपणे चालू ठेवणा-या

माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी परिवाराच्यावतीने तेलंगणा राज्यातील श्रीक्षेत्र श्रीशैलम येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मल्लिकार्जुन यात्रा उत्सवानिमित्त शनिवारी दुपारी सुमारे पाचशेहून अधिक साधू-संतांना अन्नदान करत वस्त्रदान आणि उबदार चादरीचे वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले.


खेडगी परिवाराचे धर्मकार्य आणि प्रसाद वाटपाची परंपरा सुमारे ६१ वर्षापासून कायम आहे. दानशूर, शिक्षणमहर्षी चनबसप्पा खेडगी यांनी सुरु केलेली ही परंपरा त्यांचे पुत्र कै.शिवशरण खेडगी यांनीही अखंडपणे सुरू ठेवली होती. त्यांचाच वसा माजी नगराध्यक्षा खेडगी या मोठ्या नेटाने पुढे घेऊन जात आहेत. त्यांचे सुपुत्र अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी आणि

नातवंडांना देखील या परंपरेला कृतीतून पुढे नेण्याचा धडा देत आहेत. संपूर्ण खेडगी परिवार या पुण्यकर्मात स्वतःला झोकून देऊन कार्यमग्न असल्याचे पाहायला मिळते.
साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अन्नदान करण्याच्या या धर्मकार्यातून माणसे जोडण्याच्या आणि भारतीय संस्कृती-परंपरेला पुढे नेण्याच्या या निरपेक्ष भावनेने होत असलेल्या पुण्यकर्माबाबत साधु संतांमधून समाधान व्यक्त होत आहे.
अन्नदान वाटप यशस्वी करण्यासाठी बसलिंगप्पा खेडगी, पवित्रा खेडगी, सिध्दम्मा कलशेट्टी, विजयालक्ष्मी यळमी, चन्नवीर खेडगी, स्तुती खेडगी, इंजिनिअर किरण पाटील, रावसाहेव तेगेहळ्ळी, गौरीशंकर बहिरगोंडे, बसवराज गोरे, राजेंद्र लोकापूरे, मुत्तण्णा वाले, सुरेश पेडसंगी, सुधीर राठोड, हणमंत कोळी, परमेश्वर कलबुर्गी व बसलिंगप्पा खेडगी मित्र मंडळानी परिश्रम घेतले.
दानशूर स्व. चनबसप्पा खेडगी यांनी १९७२ च्या दुष्काळ परिस्थितीमध्ये तालुक्यातील जनतेला मोफत झुणका भाकर वाटप केले. १९९२ मध्ये भीषण पाणीटंचाई परिस्थितीमध्ये स्वतःचे आॅईल मिल बंद ठेवून सुमारे सात टँकरद्वारे शहर वासियांना मोफत पाणी वाटप केले. विशेषतः खेड्या-पाड्यात जाऊन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, सायकल, दप्तर, पेन, वह्या, परीक्षा फी वाटप करण्यात ते धन्यता मानत होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कोरोना महामारीच्या काळात स्व. शिवशरण खेडगी यांनीही गोरगरीब गरजूंना त्यांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान, गरजूंना मदत करणे हे काम खेडगी परिवार सामाजिक बांधिलकीतून आवडीने करताना दिसतात. सदरची परंपरा निरंतरपणे सुरू आहे.
सध्याच्या महागाईच्या काळात समाजात अन्नदान हे महादान आहे. सर्व दानांमध्ये अन्नदान हे श्रेष्ठ मानले जाते. दानशूर स्वर्गीय चनबसप्पा खेडगी परिवारातील सदस्यांनी सुमारे ६१ वर्षाची परंपरा आजही कायम ठेवली आहेत. हे कौतुकास्पद कार्य आहे. म्हणून मातृ आणि पितृ ऋण फेडण्याबरोबरच अनाथ आणि गरजूंना अन्नदान करण्यासाठी पुढाकार घेऊन आदर्शवत व्हावेत.
– किरण पाटील
इंजिनीअर मैंदर्गी