
*आरसीएफ थळ मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहाने साजरे*

नवी मुंबई : (सुभाष हांडे देशमुख)
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ मधील आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम थळ च्या विद्यमाने गेली दहा वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येत असलेले यावर्षीचे, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठींचे वार्षिक स्नेहसंमेलन कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीतील कम्युनिटी सभागृहात शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री. एस. सी. मुडगेरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाले. प्रसंगी डॉक्टर सौ. स्मिता मुडगेरीकर, वित्त संचालिका श्रीमती नजहत शेख, तांत्रिक संचालिका श्रीमती रुतु गोस्वामी, विपणन संचालक निरंजन सोनक, कार्यपालक संचालक नितीन हिरडे, मधुकर पाचारणे, डॉ. जी. टी. पाटील, श्रीनिवास पाटील, आरसीएफ मुंबई येथील फोरमचे अध्यक्ष व्ही. डी. पाटील व सहकारी, सतीश देशपांडे व सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रचंड उत्साहाने पार पडलेल्या या सोहळ्यात सुमारे ६०० ज्येष्ठ सभासद पती-पत्नी यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रम सुरू होण्याआधी फोरमचे सभासद शशिकांत म्हात्रे व त्यांचे सहकारी यांनी छान भजने सादर करुन सुंदर वातावरण निर्मिती केली तर तिळगुळ तसेच महिलांना गजरे व दवणा देऊन केलेल्या स्वागताने कार्यक्रम अधिक भावपूर्ण बनला.

कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर वर्षभरात दिवंगत झालेल्या नामवंत व कीर्तीवंत व्यक्तीं तसेच फोरमचे दिवंगत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फोरमचे अध्यक्ष रवींद्र वर्तक यांनी प्रास्ताविकात फोरमच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.

उपस्थित जेष्ठांशी संवाद साधताना फोरमच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक करुन श्री. मुडगेरिकर म्हणाले की आरसीएफ थळ प्रकल्प उभारणीपासून आपला सर्व स्तरावर महत्त्वपूर्ण सक्रिय सहभाग लाभलेला आहे त्यामुळे या उद्योगाची चांगल्या तऱ्हेने प्रगती झालेली आहे. म्हणूनच आजच्या या स्नेहसंमेलनाला वेगळे महत्त्व आहे. कर्मचारी आणि व्यवस्थापन या दोघांमधील ऋणांची जाणीव आणि त्या अनुषंगाने टिकवून ठेवलेले अनुबंध हे आजच्या आपल्या उपस्थितीने अधोरेखित होते आहे. कंपनीतील कामाच्या ठिकाणी आपण एकमेकांच्या सहकार्याने, संघटितपणे काम करत करत सेवानिवृत्त होतो. तोच धागा निवृत्तीनंतरही आपण टिकवून ठेवून, आजही एकत्र येऊन प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदतीसाठी उभे राहण्याची भावना जपता. सुसंवाद साधता. हेच या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. फोरमच्या माध्यमातून सहकाऱ्यांना अधिक सुलभपणे जीवन जगण्यास प्रेरणा मिळते आणि एकटेपणा नाहीसा होण्यास मदत होते. म्हणूनच हा उपक्रम कौतुपास्पद आहे. माणसाला जगायला ध्येय लागते ते आपण या फोरमच्या माध्यमातून जपले आहे. सेवानिवृत्तीनंतरही आपण जपलेली ही बांधिलकी खरोखरच अभिमानास्पद आहे. असे सांगून त्यांनी सुचित केले की आरसीएफ व्यवस्थापन आपल्या पाठीशी उभी आहे. प्रसंगी नितीन हिरडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

संमेलनाचे प्रमुख वक्ते डॉ. संजय कळमकर यांचे “जगण्यातील आनंदाच्या वाटा” या विषयावर खुसखुशीत विनोदी शैलीने मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. डॉ. कळमकर यांनी ज्येष्ठ नागरिकांनी जीवनात सेवानिवृत्तीनंतर कसे वागावे व थोडे अलिप्तपणे जीवन जगून आनंदी कसे राहावे याबद्दल काही सूचना केल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश म्हात्रे यांनी कुशलतेने केले तर सुधीर सावंत व शरद पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
भालचंद्र देशपांडे यांनी आपल्या सुश्राव्य आवाजात पसायदान सादर केले.
————————————
प्रेषक :
*सुभाष हांडे देशमुख*
सचिव
आरसीएफ एक्स एम्प्लॉइज सोशल फोरम मुंबई