Pimpri-Chinchwad : देहूरोड ते बालेवाडी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन – खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
निगडी प्रतिनिधी (दयानंद गौडगांव) दि.२०, देहूरोड, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर देहूरोड ते बालेवाडी असा तब्बल साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.


खासदार बारणे यांनी आज (शुक्रवारी) सकाळच्या सत्रात पुनावळे भागातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. माजी नगरसेवक चेतन हुशार भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलताना बारणे यांनी वरील माहिती दिली. त्यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ तसेच हुशार भुजबळ, हिरामण भुजबळ, संतोष दर्शले, शरद दर्शले, अतुल ढवळे, हेमंत कोयते, राजेश दर्शले, शंकर नाना गायकवाड, अतुल काटे, दीपक भोंडवे पाटील , रेश्मा भुजबळ आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. या भागातील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर देहूरोड ते बालेवाडी असा साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. त्यासाठी 6,600 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. भूसंपादनासाठी स्थानिक शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यानंतर या उड्डाणपुलाचे काम सुरू होऊ शकेल. थेट जाणारी वाहतूक उड्डाण पुलावरून गेल्यामुळे स्थानिक वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल.
