स्व. शरदजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत महारक्तदान शिबीर
गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी
स्व. शरदजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त एस बी ग्रुपच्या वतीने रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ ह्या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोपरखैरणे येथील गुलाब सन्स डेअरीसमोरील छत्रपती संभाजी राजे भोसले रिक्षास्टँड येथे तसेच ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली रेल्वे स्टेशन येथील एस बी रिक्षा स्टँड येथे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते. सदर उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असल्याचे आयोजक एस बी ग्रुपचे अध्यक्ष डॉ देवेंद्र शरदजी नाईक यांनी स्पष्ट करून शिबिरात ५०० पेक्षा अधिक युनिटचे संकलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी एस बी रिक्षा चालक मालक संघटनेच्या प्रतिनिधींचा तसेच नवी मुंबई ब्लड सेंटर यांचा अत्यंत मोलाचा सहभाग लाभल्याचेही डॉ नाईक यांनी सांगितले. यावेळी सर्व रक्तदात्यांचा सन्मानदेखील करण्यात आला. नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवर मंडळींनी सदर शिबिराप्रसंगी उपस्थिती लावून ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.