सोलापूर – पुणे महामार्गावर कंटेनरला भीषण आग ; आगीत होरपळून एकाचा मृत्यू

यवत (प्रतिनिधी ): सोलापूर – पुणे महामार्गावर यवत जवळ आज पहाटे एका कंटेनरला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये क्लिनर म्हणून काम करत असलेल्या एकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर चेन्नई वरून भिवंडी कडे एसीचे साहित्य घेऊन जाणारा कंटेनरला पहाटे चारच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी कंटेनर चालकाने गाडीमधून उडी मारून आपला जीव वाचवला तर क्लिनर प्रिंन्स राजा परमल राहणार ललीतपुर उत्तर प्रदेश याचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच श्री दत्त ट्रान्सपोर्टचे संचालक संदीप दोरगे यांनी अग्निशामक विभागाला कळवून रुग्णवाहिका बोलून घेतली होती, तसेच यवत गावातील आबा दोरगे, अमर चोरगे, विक्रांत दोरगे, धीरज सोनवणे, समीर अन्सारी यांनी घटनास्थळी मदत कार्य केले.

यवत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, सचिन काळे झेंडे आणि कापरे यांनी मदतकार्य सुरू केले होते. परंतु एसी साहित्यात गॅस असल्याने छोटे छोटे स्पोर्ट होऊन आग आटोक्यात येत नव्हती सुमारे तीन तासाच्या प्रयत्नानंतर या आटोक्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
