गावगाथा

सामाजिक क्रांतीचे जनक : महात्मा बसवेश्वर

जयंती विशेष

सामाजिक क्रांतीचे जनक : महात्मा बसवेश्वर

सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर यांची जयंती. दरवर्षी अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली जाते. महात्मा बसवेश्वर यांचा जन्म ११०५ मध्ये झाला. महात्मा बसवेश्वर हे बिज्जल राज्याच्या दरबारात महामंत्री होते. महात्मा बसवेश्वर यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हणतात कारण त्यांनी प्रचलित सनातनी धर्मातील कर्मकांड, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, स्त्री-पुरुष, उच्चनीच, श्रेष्ठ-कनिष्ठ भेदभाव यासारख्या कुप्रथांच्या विरोधात बंड पुकारले. हे बंड म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या संस्कृती विरुद्ध पुकारलेला एल्गार होता. या बंडात सामाजिक क्रांतीची बीजे पेरली गेली होती. बाराव्या शतकात भारताचे समाज जीवन अंधकारमय झाले होते. समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड, भेदभाव वाढत चालला होता. बहुदेवता उपासना, पुरोहित वर्गाची मक्तेदारी, पाप पुण्याची दहशत, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री- पुरुष भेदभाव इत्यादींनी भारतीय समाजमन बेजार झाले होते. अशा वेळी भारतीय समाजमन जागृत करुन माणसाला माणूसपण मिळवून देण्याचे काम महात्मा बसवेश्वर यांनी केले. त्यासाठी त्यांना तत्कालीन समाजसत्तेशी, राज सत्तेशी मोठा संघर्ष करावा लागला. माणूस हा जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो अशी त्यांची धारणा होती म्हणूनच तत्कालीन व्यवस्था बदलून नवी समाजव्यवस्था त्यांचे निर्माण केली. जिथे उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, जात-पात असा कुठलाही भेदभाव नाही, विषमता नाही. कर्मकांड, अंधश्रद्धा नाही अशी समाजव्यवस्था महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या अलौकिक विचारधारेतून आणून दाखवली म्हणूनच त्यांना दक्षिणेतील गौतम बुद्ध असे म्हणतात. प्रत्येकाने कर्म करूनच जगले पाहिजे. जन्माच्या आधारे भेदभाव नाही. या त्यांच्या या विचारांची अंमलबजावणी पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केली. जगातील पहिली संसद असे ज्याचे वर्णन केले जाते ती अनुभव मंटप नावाची परंपरा त्यांनी सुरू केली. अनुभव मंटप हे असे सार्वजनिक ठिकाण होते जिथे सर्व समाज घटकांतील स्त्री पुरुष एकत्र बसून आपआपले अनुभव सांगत आणि त्यातून समाज म्हणून एकत्रितपणे पुढे जाण्याचे नियम ठरत. महात्मा बसवेश्वरांचे एक वचन आहे. कायकवे कैलास कैलास म्हणजे मोक्ष, म्हणजे काम केल्यानेच मोक्ष मिळतो. मोक्ष मिळवण्यासाठी कुठल्याही कर्मकांडाची गरज नाही. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या सहकार्याच्या मुलगा आणि मुलीच्या विवाहास समर्थन दिले जो आंतरजातीय विवाह होता. मुलगा हा चांभार समाजाचा तर मुलगी ब्राह्मण समाजाची होती. महात्मा बसवेश्वरांच्या या सुधारणावादी, समतावादी कार्याने खवळलेल्या सनातन्यांनी या घटनेचे भांडवल करून लोकांना भडकवले आणि दुसऱ्या बाजुला राजा बिज्जलचा खून करुन त्याचा आळ महात्मा बसवेश्वरांवर आणला. सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव महात्मा बसवेश्वर जीव वाचवण्यासाठी तेथून पळाले पण सनातन्यांनी अनेक शरण, शरणार्थ्यांची हत्या केली. त्यांनतर महात्मा बसवेश्वरांनी पुन्हा समतावादी लिंगायत धर्माची परंपरा वाढवण्याचा प्रयत्न केला. महात्मा बसवेश्वर यांचे समतावादी, सुधारणावादी विचार आपल्या जीवनात आचरणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. जयंतीदिनी महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button