ज्ञानदान सार्वजनिक वाचनालयाकडून सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदत ; गंभीर आजाराने त्रस्त महिलेसाठी मदतीचा हात पुढे
आर्थिक सहकार्य मदत

ज्ञानदान सार्वजनिक वाचनालयाकडून सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदत ; गंभीर आजाराने त्रस्त महिलेसाठी मदतीचा हात पुढे
भुरिकवठे, ता -अक्कलकोट समाजाप्रती बांधिलकी जपत भुरिकवठे येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयाने एक समाजाभिमुख पाऊल उचलले आहे. येथील रहिवासी उद्धव पांडुरंग बनसोडे यांच्या धर्मपत्नी यांना गंभीर आजाराने ग्रासले असून सोलापूर येथील एका नामवंत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक ओझे पडले आहे.

या संकटसमयी ज्ञानदान सार्वजनिक वाचनालयाने पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला. संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब कलशेट्टी व सचिव प्रा. चंद्रकांत पोतदार यांच्या हस्ते ५,००० रुपयांचा धनादेश नुकताच उद्धव बनसोडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

वाचनालयाच्या या सहकार्यामुळे सामाजिक संस्था केवळ ज्ञानविकासापुरती मर्यादित न राहता, समाजातील गरजूंना संकटकाळात आधार देण्याचे कार्य करत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा उपक्रमांमुळे संस्थेचा समाजात विश्वास व सन्मान अधिक दृढ होत आहे. भविष्यातही संस्थेच्या वतीने गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
