
केळठण (वज्रेश्वरी) येथील निवासी बाल संस्कार शिबिराची सांगता

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

संत श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था, आळंदी सारशी (वाडा) यांच्या माध्यमातून हभप राजेश महाराज बांगर यांच्या पुढाकाराने केलठण (वज्रेश्वरी) येथील सरस्वती गणपत पाटील विद्यालय येथे भव्य निवासी बाल संस्कार शिबीराचे आयोजन दिनांक ४ मे ते १५ मे २०२५ या कालावधीत करण्यात आले होते. गुरुवार दिनांक १५ मे २०२५ रोजी सायंकाळी हभप रमाकांत महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. सलग ५व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ह्या शिबिराचा सांगता समारंभ शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाला. यावेळी केळठण व परिसरातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थीत होती. यावेळी व्यासपीठावर हभप प्रतिभाताई पाटील, हभप यशवंत पाटील, हभप संतोश महाराज देसले, हभप साळुंखे महाराज, हभप रामचंद्र बाबा नाईक (श्रीनित्यानंद बाबांचे मानसपुत्र), हभप रामचंद्र बाबा पाटील, श्री कमलाकर पाटील सर, हभप नारायण बाबा पाटील, महेश बांगर, संजय बांगर, सरस्वती गणपत पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पाटील सर, लेखक व जॉय संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या मोबाईलच्या युगात संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी बाल संस्कारांची नितांत गरज असुन त्यासाठी पालकांचे योगदान व इच्छाशक्ती फार महत्वाची असल्याचे हभप राजेश म बांगर यांनी सांगीतले. कलियुगाच्या भयानक वातावरणामध्ये लहान मुले संस्कारहीन बनत चालली आहे. अशा वातावरणामध्ये तरुण पिढी आई-वडिलांना मानायला तयार नाही, म्हणून बाल मनावर चांगल्या संस्काराची जडण घडण होण्यासाठी संत अध्यात्मिक चिंतनाची आणि सहवासाची अत्यंत गरज आहे व हा हेतू अंतकरणामध्ये ठेवून गेल्या ४ वर्षापासून बाल संस्कार निवासी शिबिराचे आयोजन करत असल्याचे हभप बांगर महाराज यांनी सांगितले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना योगासने, भगवद्गीता, विष्णुसहस्रनाम, गायन, वारकरी गायन, मृदंग वादन, हरिपाठ आदी शिक्षण देण्यात आले. हभप राजेश म बांगर यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही याप्रसंगी सर्वच ग्रामस्थ मान्यवरांनी दिली. बाल संस्कार शिबीर भरवणे सहज सोपे नसून त्यासाठी मोठा संघर्ष व त्याग करावा लागतो असे मत वैभव पाटील यांनी व्यक्त करत त्यांचे महत्व लक्षात घेता अशा प्रकारची शिबिरे गावोगावी आयोजित करणे अत्यावश्यक झाल्याचेदेखील त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थी हा वाचनप्रिय असावा असे सांगत विद्यार्थ्याने पुस्तकी धड्यांव्यतिरिक्त अवांतर वाचनावर लक्ष केंद्रित करून शब्दसाठा व बाहेरील जगाचे ज्ञान आत्मसात करावे असेही पाटील यांनी सांगितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी हभप राजेश महाराज बांगर, हभप काशीनाथ महाराज पटारे, हभप सुधाकर महाराज अवचार, हभप साळुंखे महाराज इत्यादी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले. समारोप कार्यक्रमाप्रसंगी मुलांना वैभव पाटील यांच्यातर्फे प्रमाणपत्रे, मेडल्स, स्पर्धासाहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. निवासी बाल संस्कार शिबीर यशस्वी करण्यासाठी तन, मन, धनाने योगदान दिलेल्या सर्वांचे तसेच केळठण ग्रामस्थांचे हभप बांगर महाराजांनी आभार मानले. भोजन व फराळाने सदर कार्यक्रमाचा शेवट झाला. एकंदरीत ग्रामीण भागात उन्हाळी सुटटयांमध्ये सुरु झालेला बाल सुसंस्कार शिबीरांचा हा सिलसिला पाश्चात्य संस्कृतीचा अंगीकार करत असलेल्या व मोबाईल, इंटरनेटच्या महाजालात अडकत चाललेल्या आजच्या पिढीला संस्कारांची नवी दिशा दाखवणारा ठरत आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांवर धार्मिक व वर्तन संस्कार करणाऱ्या अशा शिबिरांचा चांगला उपयोग पाल्यांना होत असल्याबद्दल पालकांनीदेखील समाधान व्यक्त केले.
