*वटवृक्ष*
वटपौर्णिमेचा सण
वड पुजिते भक्तिनं
मिळो कुंकवाला बळ
हेचि मारते मागणं ॥
खोडा सुतविते सुत
घट्ट प्रेमाचे बंधन
सप्तफेऱ्या सभोवती
सप्तजन्माचं दे दान ॥
तुझं खोड हे विशाल
तसं धन्याला दे मन
सुख दुःख स्विकारीता
दोघं राहू आनंदानं ॥
तुझ्या फांद्या विस्तारल्या
तसा माझा वंश वाढो
देतो छाया तशी त्यांना
सेवा समाजाची घडो ॥
छाया, पान, फळासाठी
तुझ्या खांद्यावं पाखरं
वात्सल्याने खेळू देरे
माझ्या अंगणी लेकरं ॥
तुझा विस्तार पेलण्या
जसा पारंब्याचा हात
माझ्या सुखदुःखातही
उभे राहो गणगोत ॥
सत्यवानाची सावित्री
तिचा वसा रे जपतो
थोर संस्कृतीच्या लेकी
आज वडाला पुजितो
——————————————
*सचिन बेंडभर*
पिंपळे जगताप, पो- करंदी
ता- शिरूर जि- पुणे 412208.
Mob- 9822999306
Mail- sachinbendbhar3@gmail.com
Back to top button
×
No WhatsApp Number Found!