श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महिला भाविकांच्या वतीने वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.१०/०६/२०२५)
आज श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडला. भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेस व वडपुजेस अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे सकाळी ११ वाजल्यापासून असंख्य सुवासिनी महिलांनी अपार श्रद्धेने वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाची वडपूजा करून हा सण साजरा केला. याप्रसंगी बोलताना देवस्थानचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील साक्षात श्री स्वामी समर्थांचा सहवास लाभलेल्या वटवृक्षास धार्मिक व ऐतिहासिक महत्व आहे. येथे दरवर्षी वटपौर्णिमेस वडपुजेसाठी असंख्य महिला भक्त गर्दी करून वटसावित्रीने सुरु केलेली हि वडपूजा परंपरेप्रमाणे दरवर्षी स्वामींच्या दरबारी साजरी करतात. वडपूजा करण्यासाठी स्थानिक महिलांबरोबरच परगावाहून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय आहे, तसेच दरवर्षी वडपूजेकरिता येणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे अशी माहीती दिली. वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षास वडपूजा करून आपले जीवन सार्थक झाले आहे.
या वटवृक्षाच्या रुपातून साक्षात श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद आपणास लाभले असल्याचे मत काही महिला भगिनींनी व्यक्त केले. तसेच वटपौर्णिमा असल्याने श्रींच्या दर्शनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. पहाटे ५ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती. भाविकांच्या दर्शनाकरिता मंदिर समितीच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती. तसेच भक्तांच्या दर्शनाच्या व इतर सोयीकरिता व त्यांच्या सुरक्षिततेकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी देवस्थानचे मंदार पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संतोष पराणे, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, ऋषिकेश लोणारी, संजय पवार, गिरीश पवार, स्वामीनाथ लोणारी व इतर उपस्थित होते.
फोटो ओळ – वटवृक्ष मंदिरात वडपूजा करीत असताना सुवासिनी महिला दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!