नृसिंह मुळे यांचा लिंगायत समाज भूषण पुरस्काराने गौरव; समाजप्रबोधनातील कार्याची राज्यस्तरीय दखल
पुरस्कार सन्मान

नृसिंह मुळे यांचा लिंगायत समाज भूषण पुरस्काराने गौरव; समाजप्रबोधनातील कार्याची राज्यस्तरीय दखल
सोलापूर : समाजकार्य व लिंगायत चळवळीतील सक्रिय योगदानाची दखल घेत पुणे येथे वास्तव्यास असलेल्या उमरग्याच्या नृसिंह मुळे यांना ‘लिंगायत समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. येथील आंतरराष्ट्रीय व्हीआयपी वधू-वर परिचय मेळावा दि. १४ व १५ जून रोजी उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे औचित्य साधून शिवा लिंगायत युवक संघटना, लातूर यांच्या वतीने राज्यभरातील १०० सामाजिक कार्यकर्त्यांना गौरवण्यात आले, त्यामध्ये नृसिंह मुळे यांचा विशेष उल्लेखनीय सन्मान करण्यात आला.
नृसिंह मुळे हे मागील पंधरा वर्षांपासून लिंगायत चळवळीमध्ये अत्यंत सक्रिय आहेत. त्यांनी राज्यातील विविध लिंगायत मोर्च्यांमध्ये नेतृत्व भूमिका बजावली आहे. महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांनी अनेक साहित्यिक ग्रंथांना मुद्रित करण्यासाठी अर्थसहाय्य केले आहे. ‘अनुभव मंडप बसवकल्याण’ या संस्थेच्या वतीने त्यांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो.
इतकेच नव्हे, तर ते अनेक वृद्धाश्रम, अनाथ आश्रमांना नियमितपणे मदत करत असून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आपले योगदान देत आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार शिवा लिंगायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील आणि अॅड. सांबप्पा गिरवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू तसेच परदेशातून सुमारे शंभर वधू-वर उपस्थित होते. मेळावा अतिशय यशस्वीरीत्या पार पडला.
नृसिंह मुळे यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांचा सन्मान हा लिंगायत समाजाच्या एकतेचा आणि समाजकार्यातील सातत्याचा गौरव आहे.