श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या विठ्ठल मंदिरात होणार आषाढी एकादशी साजरी
आषाढी एकादशी निमीत्त विठ्ठल मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या विठ्ठल मंदिरात होणार आषाढी एकादशी साजरी

आषाढी एकादशी निमीत्त विठ्ठल मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०३/०७/२०२५)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित ए.वन चौक परिसरात असलेल्या सुमारे १५० वर्षापुर्वीच्या हेमाड पंथीय श्री उपलप विठ्ठल मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी रविवार दिनांक ०६ जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. या एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे व उपलप विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. दिनांक ०६ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त मंदीरातील विठ्ठल रुक्मिणी देवतांस वटवृक्ष देवस्थानकडून समितीचे चेअरमन महेश इंगळे व विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमती आरती उपलप यांच्या हस्ते महाअभिषेक (महापुजा) होईल. यानंतर विठ्ठल मंदीर पटांगणात सकाळी ७ ते ९ या वेळेत मराठवाडयातील श्री.विठ्ठल भजनी मंडळ (चिकूर्डा, जि. लातूर), श्री.हनुमान भजनी मंडळ (वडगांव, जि.उस्मानाबाद), श्री.संत तुकाराम भजनी मंडळ (ताडतावशी, जि. लातूर) यांची भजनसेवा होईल. तदनंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत तिर्थक्षेत्र आळंदी येथील ह.भ.प.विजय महाराज पांचाळ
यांची कीर्तनसेेवा होईल. आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण विठ्ठल मंदिरास विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे. कार्यक्रमाकरीता आकर्षक असा मंडप शामियाना उभारण्यात आला आहे. एकादशी निमित्त येणाऱ्या वारकरी भाविकांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने उपवासाचे शाबूू खिचडी, केळी प्रसाद, चहा, कॉफी इत्यादी फराळ प्रसादांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, भजन /कीर्तन सेवेचा व फराळ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचेे चेअरमन महेश इंगळे यांनी केलेे आहे.
