अरिहंत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडीतून केले समाज प्रबोधन.
आषाढी एकादशी निमित्त आयोजीत दिंडी सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी प्रथमेश इंगळेंचे प्रतिपादन.

अरिहंत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडीतून केले समाज प्रबोधन.

आषाढी एकादशी निमित्त आयोजीत दिंडी सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी प्रथमेश इंगळेंचे प्रतिपादन.


(श्रीशैल गवंडी, सोलापूर.दि.०५/०७/२०२५)
दिंडी सोहळा हा वारकरी सांप्रदायमधील धर्म संस्कृतीचा आध्यात्मिक वारसा आहे. हा वारसा जतन करण्याचे व या सोहळ्यातून समाज प्रबोधन करण्याचे महान कार्य येथील अरिहंत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमीत्त आयोजीत दिंडी सोहळ्यातून केले असल्याचे प्रतिपादन अक्कलकोटच्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा मा.नगराध्यक्ष / नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांनी केले. महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमीत्त सालाबादाप्रमाणे यंदाही आज येथील अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. याप्रसंगी प्रथमेश इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रथमेश इंगळे यांच्यासह सर्व मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करुन रामकृष्ण पोन्नम यांनी प्रथमेश इंगळे व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यानंतर
स्कूलची विद्यार्थिनी कु.तनुश्री भीमनाथ हिने आषाढी एकादशीचे महत्त्व पटवून दिले.


शाळेतील अवघं वातावरणच भक्तीमय झालं होतं. एकादशीला चंद्रभागेच्या तिरी जसा वैष्णवांचा मेळा भरतो तसा दृश्य शाळेत याची देही याची डोळा अनुभवायला मिळाले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत झेंडे, टाळ, मृदुंग तुळशी माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, बुक्का परिधान करत महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवले. सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठू माउली, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, मुक्ताबाई ,वासुदेव, श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांनी नाट्याविष्कारातून जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज यांच्या भक्ती व जीवन संघर्षाची कहाणी चितारली. शाळेतील यावर्षीचा रिंगण सोहळा खास आकर्षक ठरला. विद्यार्थ्यांनी नयनरम्य रिंगण सादर केले. विद्यार्थ्यांबरोबर अश्वही रिंगणी धावले, त्यावर छत्रपती शिवाजी महाराज अवतरले त्यांनीही विठ्ठल रखूमाई व संत तुकाराम महाराजांना मानवंदना दिली. तसेच ऑपरेशन सिंदुरच्या यशाबद्दल मानवंदनाही देण्यात आली.
शिक्षिकांनीही भान हरपून झिम्मा फुगडीचा आनंद लुटला. या सोहळ्यास वरुणराजाने अभिषेक करत हजेरी लावली. ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या घोषात टाळ, मृदंगाच्या साथीने विठुरायाचा गजर करीत विद्यार्थ्यांची दिंडी शाळेतून हिरामोती टॉवर चौकाच्या दिशेने प्रस्थान झाली. विठ्ठल, रखुमाई व संतांची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून स्वच्छता, मुली वाचवा, बालकामगारांना विरोध, पर्यावरण विषयक समाज प्रबोधनपर संदेश देत जनजागृती केली. हिरामोती टॉवर व लक्ष्मी बँकेसमोर विद्यार्थ्यांचे रिंगण पार पडले. लक्ष्मी बँकेच्या चौकात दिंडीचा सांगता सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लावण्या कोटा व तोषिता पोन्नम यांनी केले तर आभार प्रदर्शन रेवती जाकते यांनी केले.
या प्रसंगी अरिहंत स्कूलचे अध्यक्ष
डॉ.अजय पोन्नम, संचालिका सुलक्षणा पोन्नम, रामकृष्ण पोन्नम, उपमुख्याध्यापिका तस्नीम शेख, पर्यवेक्षिका रजनी सग्गम, चन्नेश इंडी, प्रथमेश इंगळे यांचे सहकारी अंकूश केत, बाळासाहेब एकबोटे, श्रीशैल गवंडी, सुनिल पवार, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, आदीत्य गवंडी, काशिनाथ सोलनकर आदींसह अरिहंत स्कूलचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
फोटो ओळ – अरिहंत इंग्लिश स्कूलच्या दिंडी सोहळा शुभारंभ प्रसंगी प्रथमेश इंगळे,
अरिहंत स्कूलचे अध्यक्ष डॉ.अजय पोन्नम, संचालिका सुलक्षणा पोन्नम, रामकृष्ण पोन्नम, उपमुख्याध्यापिका तस्नीम शेख
व अन्य दिसत आहेत.