गावगाथा

देवशयनी आषाढी एकादशीचे पवित्र औचित्य साधून अमरावतीत ‘तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हा’चा थाटात अनावरण सोहळा

साहित्य संमेलन

देवशयनी आषाढी एकादशीचे पवित्र औचित्य साधून अमरावतीत ‘तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हा’चा थाटात अनावरण सोहळा
अमरावती | प्रतिनिधी
राज्यभरातील समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह देवशयनी आषाढी एकादशीच्या पुण्यपावन दिवशी ( रविवार ६ जुलै ) , कांचन रिसॉर्ट, अमरावती येथे मोठ्या उत्साहात व भारलेल्या वातावरणात अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून संतविचारांवर निष्ठा असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि ‘संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे’ प्रमुख डॉ. रामदासजी चवरे यांच्या शुभहस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. आपल्या समर्पित भाषणात डॉ. चवरे म्हणाले, “अस्वस्थ समाजमनाच्या स्थैर्यासाठी संत चोखामेळा आणि संत सोयराबाई यांचे विचार आजच्या काळात नितांत आवश्यक आहेत.”
संमेलनाचे हे बोधचिन्ह केवळ दृश्य प्रतीक नसून, समता – बंधुता – मानवता या त्रिसूत्री विचारांचा व संमेलनाच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचा प्रतीकात्मक संदेश घेऊन आले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत अभ्यासिका डॉ. कमलताई गवई , ज्येष्ठ साहित्यिका शिलाताई गेहलोत , उद्योजिका कांचनताई उल्हे, ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव चाळक , परिवर्तन प्रबोधिनीच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.शोभाताई रोकडे , प्रा. रेखा बेलसरे, शिक्षणप्रेमी डॉ.नरेशचंद्र काठोळे , प्रख्यात उद्योगपती सुदर्शनजी गांग , संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते .
या वर्षीचे तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन दिनांक ४ व ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमी नरसी नामदेव (जि. हिंगोली) येथे होत असून संमेलनाचे अध्यक्षस्थान संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये भूषवणार आहेत.
या संमेलनाचा गाभा म्हणजे समतेच्या विचारांचा जागर. आजच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, संतांच्या विचारांवर आधारित संवाद, सर्जनशील कार्यक्रम व सांस्कृतिक मैफिली समाजमनाला स्थैर्य, समज आणि समतेचा मार्ग दाखवणारे ठरणार आहेत.
संमेलनाचे बोधचिन्ह म्हणजे या प्रवासाचा आत्मा – समतेची पताका घेऊन, विठ्ठलभक्तीच्या मार्गाने पुढे जाणाऱ्या संतांचा संदेश समाजाच्या मनामनात पुन्हा रुजवण्याचा हा प्रयत्न आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले. परिवर्तन प्रबोधिनी अमरावती यांच्या सहकार्याने सदर सोहळा संपन्न झाला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button