गावगाथाठळक बातम्या

Mumbai: मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई

मुंबई : मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते. शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात, हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वास देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी रविवारी गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवताना सरन्यायाधीश गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी राज्याचे कौशल्य विकासमंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार, चिकित्सक समूहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, सचिव डॉ. गुरुनाथ पंडित, मुख्याध्यापिका संचिता गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 

शाळेतील मित्रांशी केल्या गप्पा; वर्गातही रमले…

सरन्यायाधीश गवई यांनी शाळेतील वर्गखोल्या, वाचनालय, चित्रकला विभाग आदींची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शालेय जीवनात त्यांच्यासोबत शिकलेल्या मित्रांशी गप्पा करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती शाळेसाठी अत्यंत गौरवाची व प्रेरणादायी ठरली.

 

सरन्यायाधीश म्हणाले…

आज मी ज्या उंचीवर पोहोचलो आहे, त्यामागे माझ्या शिक्षकांचे आणि शाळेचे फार मोठे योगदान आहे.

याच शाळेतील संस्कारामुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली.

वक्तृत्वाची सुरुवातीची पावले याच व्यासपीठावर पडल्याची आठवण सांगितली. वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आत्मविश्वास मिळाला. त्या संधींमुळेच मी घडलो.

मातृभाषेतून शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात, हेच संस्कार आपल्याला आयुष्यभर साथ देतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button